________________
(१२) आत्मजिज्ञासेपासून आत्मदर्शनापर्यंत
पारमिता खणसे
आत्मजिज्ञासा हे जैनदर्शनाचे मूलसूत्र आहे. आचारांगसूत्र आत्मजिज्ञासेपासूनच सुरू होते. 'के अहं आसी ?' या प्रश्नाचे उत्तर देत असताना संपूर्ण आचारांगात वेळोवेळी आत्म्यासंबंधी चर्चा येते. आत्मा इंद्रियांनी जाणता येत नाही, तर त्याद्वारे होणाऱ्या क्रियांनी आत्म्याचे अस्तित्व समजते. या क्रियांमुळेच कर्मबंध व भवभ्रमण होते. शरीर - आकृती, वर्ण, नाम, गोत्र, सुखदुःखांचे अनुभव व विविध योनींमध्ये जन्म या सर्वांमुळे प्रत्येक जीवाची स्वतंत्रता निदर्शनास येते.
-
‘एगमप्पाए संपेहाए' या पदात आत्मा हा एकटा असून, एकटाच कर्म करतो व एकटाच कर्म भोगतो. दुसरे दार्शनिक म्हणतात की, भूतमात्रांना (पंचमहाभूतांना) दास बनवावे, त्यांच्यावर शासन करावे इ., त्यामध्ये काहीही दोष नाही. परंतु भ. महावीरांनी आचारांगात म्हटले आहे की, ही पंचमहाभूतेसुद्धा पृथक्-पृथक् एकेंद्रिय आत्मेच ( जीवच ) आहेत. आपल्याला जशा वेदना होतात, तशाच वेदना त्यांनाही होतात. त्यांची गणना एकेंद्रिय जीवात करणे, इतकेच नव्हे तर विकल मनुष्याला छेदन - भेदन - आघात इ. केल्याने जेवढे दुःख होते तेवढेच दुःख एकेंद्रिय जीवांना सुद्धा होते - इतक्या सूक्ष्म अंगांनी प्रत्येक जीवांचा विचार केला आहे. 'पंचमहाभूतांच्या आधारे म्हणजेच जैनदर्शनानुसार एकेंद्रियांच्या आधारेच सर्व जीव जगतात् राहतात' असे जवळजवळ सर्व दार्शनिक मानत असतील तरी त्यांना जीव संज्ञा देणे, हे फक्त जैनदर्शनाचेच वैशिष्ट्य आहे.
४२