________________
पहिले म्हणजे कटू सत्य बोलू नये. हे साधूंना खरोखरीच शक्य आहे का? कारण कटू बोलल्याशिवाय सत्य प्रतिपादन करता येत नाही. कटू बोलल्याशिवाय तथ्य उमगत नाही. तसेच सत्य वदवून घेण्याकरिता कठोर मार्गाचा अवलंब करावाच लागतो. या संदर्भात २५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या शय्यंभवाचार्यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहे ना ! सत्य जाणून घेण्याकरिता त्यांना आपल्या गुरूंवर तलवार उगारावी लागली होती.
तसेच समाजातील अपप्रवृत्ती दाखविण्याकरिता, त्यातील भयावहतेची जाणीव करून देण्याकरिता कठोर बोलण्याला पर्याय नाही. अन् तसे सांगणारा साधू अप्रिय ठरतो असे नाही. महावीर आपल्या प्रवचनातून ‘लज्जमाणा पुढो पास' असे शब्द वापरीत. तरुणसागरजी महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकाला 'कडवे प्रवचन' असे नाव आहे. अन् दोघेही जनमानसात आदरणीय आहेत.
दुसरी गोष्ट गुणग्राहकतेची. बुद्धिमान, गुणी माणसांचा साधूने गुणगौरव करावा. चांगल्याला चांगलेच म्हणावे असे नमूद केले आहे. पण हल्ली दिसते काय! पैसेवाल्या धनिकांचा गौरव तेवढा होतो आहे. उदोउदो होतो आहे. मग भलेही त्यांचे धंदे समाजविघातक का असेनात ! समाजोपयोगी कामाकरिता पैसा लागतो. तो असे धनिकच देऊ शकतात. हे जरी खरे असले तरी साधूने किती वाहवून जावे हे पहावेच लागेल. कारण अशा गोष्टींमुळे तरुण वर्ग जैन धर्मापासून दूर जाताना दिसतो आहे. तेव्हा साधूने विवेकाचे भान ठेवून कटू सत्य सांगावे, ते सांगण्यात प्रामाणिकता असावी, सांगताना कथामाध्यम निवडले तर ते परिणामकारक ठरते हे आगमांतील कथांतून दिसले आहेच. तसेच गुणग्राहकता जरूर दाखवावी परंतु ती करताना तारतम्य भाव ठेवून निरपेक्ष रितीने, नि:पक्षपातीपणाने करावी एवढेच वाटते.