________________
( ९ ) भाषाजात अध्ययन : काही विचार
सुमतिलाल भंडारी
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भाषेचा वापर आपण सतत करीत असतो. बऱ्याच वेळा बोलून गेल्यावर आपल्याला चुटपुट लागते. आपण दुसऱ्याला दुखावले, असे बोलायला नको होते असेही विचार मनात येतात. त्यामुळे भाषेचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरते. साधूंच्या बाबतीत गोचरी, विहार, प्रवचन, चर्चा या माध्यमातून भाषेचा वापर सतत होत असतो. हे लक्षात घेऊनच २६०० वर्षांपूर्वी आपल्या आचार्यांनी भाषाजात हे अध्ययन आचारांग श्रुतस्कंध -२ यात देऊन साधूंना भाषेचा वापर करण्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. भाषेचा वापर कसा करावा एवढेच न सांगता तो कसा करू नये हेही उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे.
याचे दुसरेही कारण म्हणजे जैन संप्रदायात साधू हा त्याच्या कडक व संयमी आचरणाने नेहमीच आदरणीय ठरला आहे. त्याच्या शब्दाला वजन आहे. लोक त्यांना आपला मार्गदर्शक मानतात. अशा साधूची जनमानसातील प्रतिमा तशीच रहावी हाही या अध्ययनाचा हेतू असावा. साहजिकच भाषा वापराचे सूत्र सांगताना साधूने सत्य बोलावे, कटू सत्य सांगू नये, इतरांविषयी आदराने बोलावे, बोलण्यात बोचरेपणा, आक्रमकता नसावी. हिंसेला प्रवृत्त करणारी विधाने करू नये, अंधश्रद्धा पसरवणारी विधाने करू नयेत, अशी ३० मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
या तत्त्वांचा विचार करताना, ही तत्त्वे आजच्या काळात कशी पाळली जात आहेत हा विचार मनात आला. उदाहरणादाखल दोन तत्त्वांचा विचार करू.
३५