________________
मलमूत्राबरोबर, थुंकी, ओकारी, नाक शिंकरणे, पिंक टाकणे, चूळ भरणे हे विसर्जित होणारे पदार्थ जिथे-तिथे घाण, दुर्गंधी, अस्वच्छतेस कारण व आरोग्यास घातक आहेत. यातून सम्मूर्च्छिम जीवांची उत्पत्ती शीघ्रतेने होते. त्यांच्या हिंसेस आपण कारण होतो. घराघरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यानेही दुर्गंध, सडण्याच्या क्रिया होऊन प्रदूषण होते. हॉटेल, हॉस्पिटलमधून निघणारा कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. डिस्पोजेबल् प्लॅस्टिक डिश, ग्लास, वापरलेल्या कॅरीबॅग, पॅकिंगसाठी वापरलेले थर्माकोल इ. मानवनिर्मित कचरा पुन्हा मानवाच्याच हातांना उचलणे अवघड झालेले आहे. वाहनांचे वायूत होणारे प्रदूषण तर वायुमंडलच दूषित करीत आहे. हे सर्व भूमि, वायु, अग्नि, जल यांच्याबरोबरच सर्वच जीवांना पीडादायक होतात. नकळत कर्मबंध होतो व जन्ममरणरूपी चार गतीत अखंड भ्रमण होत रहाते. सुखापेक्षा दुःखेच अधिक सहन करावी लागतात. यावर उपाय म्हणून जिनेन्द्रांनी वरील नियम ढोबळरूपाने सांगितलेले आहेत.
मनास कडक शिस्त लावल्याने, परिग्रहांचा संकोच केल्याने व मर्यादेचे महत्त्व जाणल्याने काहीसे स्वरूप बदलेल असे वाटते. “आत्मवत् सर्वभूतेषु” या तीन शब्दात सर्व काही आले. शंका अशी येते की निर्जंतुक स्थान कसे शोधायचे ? जीवजंतू तर सर्व लोक भरून आहेत.
तात्पर्य :
शिस्त बोलण्यात, चालण्यात, उठण्या - बसण्यात, खाण्या-पिण्यात, झोपण्यात, वस्तू ठेवण्या-घेण्यात, स्वत:च्या गरजेतही असली पाहिजे. ज्यामुळे मन, वचन, काय व भावही सावध असले पाहिजेत. म्हणजे जीवहिंसा अत्यल्प होईल हा जिनेंद्र-उपदेशाचा हेतू आहे.
२७