________________
भगवंत हे सर्वज्ञ, सर्वदर्शी होते. त्यांनी मानवी मनाचा अत्यंत बारकाईने शोध घेतला आहे. आचारांगातल्या अनेक प्रसंगांवरून आपल्या लक्षात येते की त्यांची मौलिक शिकवण, सिद्धांत हे सर्वकाळात सर्वसामान्य लोकांनाही लागू पडतात. हा जणू काही मानवी मनाचा आरसा आहे. आचार आणि सिद्धांतांचे, नियमांचे प्रतिपादन हे काही अर्थी मनोवैज्ञानिक दृष्टीचा परिचय देतात.
आचारांगाची मनोवैज्ञानिक दृष्टी पुढील मुद्यांवरून दिसून येते. १) व्यक्तीचे मूलभूत आणि सारभूत तत्त्व त्याचे आपले अस्तित्व आहे. आचारांगात आत्मज्ञानाच्या लक्षणावर जोर दिला आहे.
२) मनुष्य हिंसा कोणकोणत्या कारणांसाठी करतो ह्याचे अत्यंत सुंदर विश्लेषण केले. जीवन निर्वाह, वंदना, गुणानुवाद, मानसन्मान, जन्ममरणापासून मुक्ती, दुःख निवारणासाठी व सुख प्राप्तीसाठी आपणही चिंतन केले तर लक्षात येते की ह्याखेरीज दुसरी कोणतीही कारणे हिंसेमागे नाहीत.
३) बंध व मुक्तीचे तत्त्व बाहेर नाही तर आतच आहे. कामभोगाच्या प्रति आसक्तीनेच बंध होतो आणि तीच दुःखाला कारण आहे. बंध व मुक्ती हा साधकाच्या अंतरंग भावनांचा खेळ आहे.
४) जो अप्रमत्त आहे तो कामनांनी आणि पापकर्मांनी उपरत आहे. प्रमत्तालाच विषयविकारामध्ये आसक्ती राहिल्यामुळे भीती असते. अप्रमत्ताला नाही. ५) ' आयंकदंसी न करेइ पावं', जो आपली पीडा आणि वेदनेला बघतो, जाणतो तो पापकर्मामध्ये फसत नाही. जेव्हा दु:खाचा स्वत: आत्मनिष्ठरूपाने अनुभव करतो तेव्हा तो हिंसेपासून परावृत्त होतो.
२४