________________
(३) आचारांग : मनोवैज्ञानिक दृष्टी
-
संगीता कटारिया
आचारांगसूत्राला द्वादश अंगांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणूनच सर्व अंगांचे सार म्हटले आहे. आपला जसा आचार तसाच विचार असतो. शुद्ध आचाराने विचारांची शुद्धी होते व दोन्हीमुळेच कर्माचा क्षय होऊन मोक्षप्राप्ती होते. अध्यात्मसाधनेचा मुख्य पाया आचार आहे. भ. महावीरांनी जगाला एक नवीन चिंतनाची दिशा दिली आहे की ज्यानुसार वागून मनुष्य आपल्या स्वत:मध्ये परिवर्तनाच्या प्रक्रियेचा अनुभव करतो. भगवंतांनी एकीकडे हिंसेपासून मुक्त अशा विश्वाची कल्पना केली आणि दुसरीकडे मनुष्याच्या मनात मनुष्यत्व जागवण्याचा समर्थ प्रयत्न केला. सगळ्या जीवसृष्टीबद्दलची संवेदनशीलता, विचारचेतना जागृत करणे हे आचारांगाचे खरे प्रयोजन आहे.
भगवंतांनी जोपर्यंत स्वतःला आध्यात्मिक उन्नतीचा साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत कोणताच उपदेश केला नाही. आत्म्यापासून परमात्मा बनवण्याचा मार्ग तर दाखविला परंतु त्याचबरोबर मनुष्याला वर्तमान जीवन जगण्याची कला शिकवली. सतत ज्ञाता, द्रष्टा बनून पहा, जाणा व चिंतन करा हे सांगितले. आपल्या साधनाकाळात त्यांनी आजूबाजूच्या विश्वाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण, चिंतन केले व त्यानंतर स्वअनुभवाच्या जोरावर उपदेश केला. भगवंतांचे हृदय प्रेम, करुणा, अहिंसेने भरलेले होते. म्हणून जगाला सांगितले की ह्या अदृश्य अशा षट्कायिक जीवांशी वागताना सतत जागृती, विवेक ठेवावा. अहिंसेचा इतका सूक्ष्म विचार की जे आजच्या पर्यावरणविषयक समस्यांना लागू पडतात. पर्यावरणाशी वागताना जणू एक दुर्बिण आपल्यासमोर ठेवली आहे.
२३