________________
बाह्य, दृष्य शत्रूवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूद करणारा हा पराक्रम नव्हे. हा तर ‘संयमाचा पराक्रम' आहे. आजूबाजूच्या त्रस (हालचाल करू शकणाऱ्या) जीवांना तर हा वीर जपतोच पण पृथ्वी, जल, अग्नि, वायु व वनस्पती या एकेंद्रिय जीवसृष्टीविषयीही हा जागृत, अप्रमत्त असतो. पर्यावरणाच्या सर्व घटकांचे हा प्राणपणाने रक्षण करतो.
भोजन करताना, वस्त्रे परिधान करताना, मार्गक्रमण करताना तसेच मल-मूत्र विसर्जन करताना हा आजूबाजूच्या कोणत्याही स्थूल-सूक्ष्म जीवाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेतो. हीच ‘शस्त्रपरिज्ञा' अर्थात् 'विवेक' आहे. ____सामान्य वीर हे शत्रूना बंदी बनवितात, त्यात भूषण मानतात. हे आध्यात्मिक 'वीर' आपल्या उपदेशाने अनेक प्राणिमात्रांना बंधनांपासून मुक्त करतात. भ. महावीर म्हणतात, ‘णारतिं सहते वीरे, वीरे णो सहते रतिं' - अर्थात् हे वीरपुरुष संयम साधनेतील स्वत:ची ‘अरति' आणि असंयमातील 'रति' दोन्हीही सहन करत नाहीत. माध्यस्थवृत्ति धारण करतात.
___ अत्यंत मोजका, नीरस आणि रुक्ष आहार ते स्वीकारतात. स्वतः अन्न शिजवीत नाहीत. इतरांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या आहारातील अगदी मोजकी भिक्षा जीवननिर्वाहापुरती ग्रहण करतात. वीराचे लक्षण सांगताना भ. महावीर म्हणतात, 'जागर-वेरोवरए वीरे' अर्थात् हा वीर सदैव अहिंसेविषयी जागृत आणि वैरभावापासून दूर असतो. ___ मेधावी, निश्चयी व विवेकी साधक ‘आत्मगुप्त' असतो म्हणजेच कुशल सेनापतीप्रमाणे स्वत:ला शाबूत ठेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या मनात डोकावणाऱ्या क्रोध, अहंकार, कपट, लोभ या भावनांवर मात करतो. हा वीर ‘क्षेत्रज्ञ' असतो म्हणजेच रणांगणाचा जाणकार आणि रणनीतीत कुशल
१२