________________
भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे १००० वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात. पहिला अंगग्रंथ ‘आचारांग' नावाने सुप्रसिद्ध आहे. प्राकृत भाषातज्ज्ञांनी या ग्रंथाचा पहिला विभाग 'अर्धमागधी' भाषेचा सर्वात प्राचीन नमुना म्हणून स्वीकारार्ह मानला आहे. या ग्रंथाचा अभ्यास करीत असताना त्यातील 'वीर' आणि ‘महावीर' या शब्दांकडे माझे लक्ष वेधले गेले. भ. महावीर स्वत: 'वीर' शब्द कोणकोणत्या संदर्भात वापरतात याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे तद्विषयक विचार या लेखात मांडले आहेत.
आचारांगाची भाषाशैली उपनिषदांशी अतिशय मिळतीजुळती आहे. महावीरांच्या उपदेशाचा काळ हा वैदिक परंपरेतील उपनिषत्काळाशी निकटता राखणारा असल्याने, ही गोष्ट नैसर्गिकच आहे.
'वीर' हा शब्द वाच्यार्थाने रणांगणावर पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्याचा वाचक आहे. आचारांगात मात्र तो मेधावी, विवेकी मुनीसाठी उपयोजित करण्यात आला आहे. 'शस्त्रपरिज्ञा' आणि 'लोकविजय' या शीर्षकांच्या अध्ययनांमध्ये त्यांनी या शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग केला आहे. अर्थातच हा 'आध्यात्मिक विजय' आहे, रणांगणावरील विजय नव्हे. 'अत्युच्च आत्मकल्याण' हे ध्येय, उद्दिष्ट आहे. ‘अहिंसेचे पालन' हा त्याचा मार्ग आहे. ते म्हणतात, 'पणया वीरा महावीहिं'-अर्थात् वीरपुरुष या महापथाला समर्पित आहेत ( जसा योद्धा ध्येयपूर्तीसाठी समर्पित असतो तसे). असे वीर 'पराक्रमी' आहेत. ते साधनेतील अडथळे, विघ्ने यावर मात करतात.
१८