________________
आचारांग : विद्यार्थियों के विचार-उन्मेष
(१) महावीरांच्या दृष्टीने 'वीर' कोण ? (दै. प्रभातच्या महावीर विशेषांकात प्रसिध्द झालेला लेख, २०११)
- डॉ. नलिनी जोशी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर 'भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व ५९९ मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह') जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात 'ज्ञात' कुळातील राजा सिद्धार्थ व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या' मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना ‘महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान-प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय व चिंतनशील होते. वयाच्या २८ व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमतीने त्यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दु:खी-गरजू लोकांना विपुल दाने दिली.
__वयाच्या तिसाव्या वर्षी ‘मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा' घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्री दीप प्रज्ज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात.
१७