________________
(३२)
पहात आहे की एकाच वेळी उष्णता आणि शीतलता दोघांचा अनुभव येत आहे. ते आपल्या गुरूंजवळ गेले. गुरूंनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले की वास्तविक एकदा एकच क्रिया होते परंतु मनाची गती अत्यंत सूक्ष्म असल्याने दोन क्रियेमध्ये वेगळेपण असूनही त्याचे आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. गुरूंच्या मताशी गंगमुनी सहमत झाले नाहीत आणि ते संघातून वेगळे झाले. त्यांनी द्वैक्रियावादाचा प्रसार केला. त्रिराशिवाद (त्रैराशिकवाद)
'श्रीगुप्त' नावाचे आचार्य होते ते अंतरंजिका नगरीच्या 'भूतगृह' नामक चैत्याच्या नगरीत थांबले होते. त्यांचा रोहगुप्त नावाचा शिष्य त्यांना वंदन करण्यासाठी जात होता. तेथे पोट्टशाल नावाचा एक संन्यासी आपली विद्या दाखवून लोकांना आश्चर्यचकित करत होता. तो दुसऱ्यांना चर्चेसाठी आव्हाने देत होता. आचार्यांनी रोहगुप्ताला आज्ञा केली की, पोट्टशाल परिव्राजकाचे आव्हान स्वीकार. आचार्यांनी त्याला अनेक विद्या शिकविल्या. राजसभेत पोट्टशालाबरोबर रोहगुप्ताचा शास्त्रार्थ झाला. पोट्टशालाने जीव आणि अजीव दोन राशी स्थापन केल्या. रोहगुप्ताने त्याला हारविण्यासाठी जीव, अजीव आणि निर्जीव अशा तीन राशी स्थापल्या आणि पोट्टशालाला पराजित केले. नंतर ते गुरूजवळ आले. घडलेला वृत्तांत सांगितला. गुरूंनी सांगितले की तुम्ही तीन राशीची चुकीची स्थापना केली आहे. राशी दोनच आहेत. पुन्हा राजसभेत जा आणि ह्या गोष्टीचा प्रतिवाद करा. रोहगुप्त आपल्या गोष्टीवर अडून बसला. गुरूंची आज्ञा मानली नाही. रोहगुप्ताचे गुरू श्रीगुप्त राजसभेत गेले आणि सांगितले. रोहगुप्ताची तीन राशींची स्थापना चुकीची आहे, तरी रोहगुप्ताने स्वतःचा हट्ट सोडला नाही. त्यांना संघातून वेगळे केले. त्यांनी त्रैराशिवादाचा प्रचार केला. अबद्धिक वाद
'गोष्टामाहिल' नावाचे सातवे निह्नव होते. 'आर्यरक्षित' नावाचे त्यांचे उत्तराधिकारी दुर्बलिका पुण्यमित्र झाले. एकदा ते आपले शिष्य विंध्यमुनींना कर्मप्रवादचा पाठ देत होते. त्यात दोन प्रकारच्या कर्मांचे वर्णन आलेले आहे ते असे की काही कर्म अशी असतात की जे ओल्या भिंतीवर माती चिकटते तसे चिकटून जातात, संश्लिष्ट अथवा एकरूप होतात. काही कर्म अशी असतात की जे सुकलेल्या भिंतीवर मातीप्रमाणे केवळ आत्म्याला स्पर्श करून विरून जातात, खाली पडतात, कर्म आत्म्याने पृथक् होतात....