________________
(३८०)
जसे कोणी पुरुष तर्काने पाणी आणि दुधामध्ये भेद करतो त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषही उत्तमध्यानाद्वारे चैतन्य आणि अचैतन्यरूपी 'स्व-पर' मध्ये भेद करतो.१७०
आत्मा स्वभावतः परम आनंदयुक्त, अव्यय-अविनाशी, अनादी-अनंत शक्तियुक्त, प्रकाशयुक्त, लेपरहित आहे. परंतु जेव्हा तो जड शरीरावर आश्रित राहतो, त्यालाच आपले मानू लागतो तेव्हा तो अग्नी ज्याप्रमाणे पाण्यात टाकलेल्या पाऱ्याला गरम करतो तसेच पापही जीवाला संतप्त करते.१७१
पारा सरळ अग्नीवर गरम होत नाही. परंतु पाऱ्याला जर गरम करायचे असेल तर गरम पाण्याच्या आधाराने केले जाऊ शकते. तसा आत्मा स्वभावतः कर्ममळरहित आहे. अनादी, अनंत, केवलज्ञान, केवलदर्शनाने अनंतवस्तू स्वरूपाला ग्रहण करणारा, लोकालोकमध्ये प्रकाशित करणारा आहे. परंतु जड शरीराच्या बंधनामुळे त्याचे अनंतगुण आवृत्त होतात. आत्मा पराश्रित होतो. सिंहाचे संपूर्ण जंगलावर वर्चस्व असते. त्यामुळे सर्व प्राणी भयभीत होतात. परंतु त्याला पिंजऱ्यात बंद केले तर त्याची सर्व शक्ती कुंठित होते.
__ "जो ह्या आत्म्याच्या अनंत शक्तीला ओळखत नाही तो मोहबद्ध होऊन 'पर' पदार्थाला 'माझे माझे' सांगतो. जशी बकरी कसायाच्या घरात अस्थी, वसा अजश्रृंग इत्यादी बिभत्स पदार्थ पाहून ‘में में' ओरडता ओरडता मृत्युमुखी पडते. त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा 'माझे माझे' करता करता मरून जातो. परमार्थतः कोणी कोणाचे राहत नाही.१७२
जीवाचे हे शरीर अणुप्रचय निष्पन्न आहे. अर्थात पुद्गल परमाणूच्या समूहाने निर्मित आहे आणि शरीरी अर्थात आत्मा उपयोगमय आहे. हा अत्यक्ष म्हणजे अतीन्द्रिय आहे. इंद्रियगोचर नाही. हा ज्ञानविग्रह-ज्ञानात्मक कलेवरमय आहे. दोघांमध्ये एकदम वेगळेपण
आहे. तेव्हा हे शरीर 'स्व' कसे होईल ? हे तर 'अन्य'च आहे. परंतु ज्यांनी संसाररूपी पिशाच आपल्या वशीभूत केले आहे, जो त्याला दुःखी करीत आहे अशा शरीर आणि आत्म्याच्या भिन्नतेला मूढ प्राणी समजू शकत नाही. जन्म आणि मृत्यूच्या वेळी सर्व लोकांमध्ये प्रतीत होते की, या दोन्हींमध्ये संपूर्णपणे वेगळेपणा आहे. जेव्हा जन्म घेतो तेव्हा मागचे शरीर बरोबर येत नाही आणि मरतो तेव्हा सुद्धा हे शरीर बरोबर जात नाही कारण हे दोन्ही एकदम पृथक आहेत. शरीर तर मूर्त आहे- आकार युक्त आहे, चैतन्यरहित, स्वतंत्र पुद्गल परमाणूंनी बनलेले आहे आणि आत्मा अमूर्त आहे. अमूर्ततेचा मूर्ताबरोबर संबंध कसा काय होऊ शकेल ?१७३