________________
(३७९)
गतींमध्ये जाऊन जन्म घेतात. म्हणून कोणी कोणाचा मित्र नाही. सर्वजण कर्मानुसार दोन दिवस आपल्यावर उपकार अथवा अपकार करून निघून जातात.
संसारामध्ये सर्वांचे स्वभाव वेगवेगळे आहेत असे दिसून येते. कोणाच्या स्वभावाबरोबर कोणाचाही स्वभाव जुळत नाही. सर्वजण स्वतःची स्वार्थसिद्धि करण्यासाठी दुसऱ्यांवर प्रेम करतात. स्वार्थाशिवाय कोणी कोणावर प्रेम करीत नाही. जसा वाळूच्या कणांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो परंतु त्याच्यात पाणी टाकल्यावर त्याला एकत्रित करून मुट्ठीत पकडू शकतो परंतु थोडासा जोर लावून दाबले असता त्याचे कण नि कण विखुरले जातात. संसारी लोक सुद्धा आपल्या विषय कषायाच्या पुष्टीसाठी प्रेम करतात. कोणी कोणी प्रयोजन नसताना सुद्धा एकमेकांवर प्रेम करताना दिसून येतात पण ते लोकलज्जेमुळे अथवा आपल्या अहंकाराच्या पोषणासाठी अथवा पुढे त्यांच्याकडून काही प्रयोजन सिद्ध होईल या उद्देशाने प्रेम करतात.
आत्म्याच्या स्वभाव शरीरापेक्षा एकदम विपरीत आहे. आत्मा चैतन्यमय आहे, शरीर अचैतन्य आहे. जड आहे. तसेच शरीराबरोबर संबंध ठेवणारे आत्म्याहून वेगळे आहे. शरीर अनेक पुद्गल परमाणूंच्या समूहाने निर्माण झाले आहे. ते परमाणू वेगवेगळे झाले असता शरीर नष्ट होते. आत्मा चैतन्यमय अखंड अविनाशी असल्याने ह्या सर्व परवस्तूमध्ये माझे काहीच नाही असा निश्चय करणे अन्यत्व भावना आहे.१६८
जो साधक आत्म्याला पर पदार्थापासून वेगळे पाहतो. त्याला शोक, शंका, शल्य कसे त्रस्त करू शकतील ?१६९
जो आत्मा आणि आत्मेतर समग्र पदार्थाची अन्यत्वता, परत्वता, भिन्नत्वता समजून घेतो तो कधी दुःखी होत नाही कारण सुख 'स्व' भावात आहे. दुःख पर भावात आहे. 'पर'ला 'स्व' मानणे सत्याचा विपर्यास आहे. त्यामुळे दुःख तर होणारच.
"वादे वादे जायते तत्त्वबोधः" जसे चर्चा, विचारणा केल्याने तत्त्वांचा बोध होतो. तसेच आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदिध्यासन केल्याने आत्मबोध होतो आणि "भावे भावे जायते स्वात्मबोधः' अर्थात भावनेने अनुभावित आप्लावित झाल्याने आत्मस्वरूपाचा बोध होतो. ज्याला स्वरूपबोध झाला आहे. त्याच्या शरीरावर प्रहार झाले तरी आत्मा त्रस्त होत नाही.
भगवान महावीरांना बारा-बारा वर्षापर्यंत उपसर्ग झाले. शारीरिक त्रास झाला तरी आत्मा आणि शरीराच्या भेदाला जाणत होते त्यामुळे त्यांचा आत्मा दुःखी झाला नाही.