________________
संसारात लोक कोणाचा मृत्यू झाल्यावर शोक करतात, धन नष्ट झाले असता दुःखी होतात. परंतु स्त्री, पुत्र, धन आणि भवन इत्यादींच्या मोहपाशात गुंतण्यासारखे काही नाही कारण ते क्षणात दृश्य-अदृश्य होणारे आहेत. पाहता पाहता ते नष्ट होतात.
जीव एकटाच स्वतःला कर्माने कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे गुंडाळून घेतो, आवृत्त करीत राहतो. पुन्हा कधी पुण्याच्या उदयाने दान, व्रत, उपवास, सम्यक्त्व, लक्षणरूप प्रशमतंतूंचा आसरा घेऊन कर्मपाशातून सुटतो, ज्यायोगे मोक्षस्थानापर्यंत पोहचता येते. अर्थात आपणच कर्माने बद्ध होतो आणि स्वतःच मुक्त होतो. दुसरा कोणीच आपल्याला बांधत नाही किंवा सोडवित नाही.१३३
ह्याच गोष्टी वैराग्यशतकाच्या एका प्रसिद्ध गाथेमध्ये अधिक स्पष्ट करून सांगितल्या आहेत. तेथे लिहिले आहे -
अडकम्मपासबद्धो, जीवो संसारचरिए ठाइ ।
अडकम्मपासमुक्को, आया सिवमंदिरे ठाइ ।। अष्टकर्मरूपी पाशाने बद्ध जीव संसाररूपी तुरुंगात राहतो आणि अष्टकर्मरूपी पाशातून मुक्त झालेला आत्मा शिवमंदिरात राहतो. ह्याचे विवेचन पन्यास रत्नसुंदर विजयजींनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात केले आहे.
लहानसे बंधनसुद्धा जीवाला पराधीन बनवते, तर ज्यांना आठ आठ कर्मांचे बंधन आहे अशा व्यक्तीने त्या कर्मबंधनातून सुटका होण्यासाठी किती प्रयत्न केला पाहिजे?
घरात एका भिंतीच्या मागे असलेल्या सामग्रीचे दर्शन करविणे कठीण होत असेल तर ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयुष्य, नाम, गोत्र आणि अंतरायरूपी आठ आठ भिंतींच्यामागे असलेल्या आत्म्याचे दर्शन कसे होऊ शकेल ? परंतु ह्या भिंती दुसऱ्या कोणी निर्माण केलेल्या नाहीत. हे बंधन तर आत्म्याने स्वतःवर थोपवून घेतले आहे आणि म्हणूनच आत्मा जेव्हा वाटेल तेव्हा ह्या बंधनातून मुक्तसुद्धा होऊ शकतो. असे तेव्हाच होईल जेव्हा जीवाला सर्वज्ञप्रणीत वचनावर श्रद्धा होईल. मी अनंतज्ञान, अनंतदर्शन इत्यादी गुणांचा मालक आहे. मी एकच आहे, नित्य आहे, ज्ञानदर्शनयुक्त आहे. बाकी सर्व काही बंधन आहे अशा आत्म-विचारात स्वतःला निमग्न केले तर बंधनातून मुक्त होणे अत्यंत सोपे आहे.
परंतु जीवाने जर आठ कर्मांच्या बंधनाबरोबर समाधान मानले आणि विचार