________________
(३५१)
श्री जिनचंद्रसूरींद्वारे प्रणीत संवेग रंगशाला नामक ग्रंथामध्ये क्षपकमुनींना श्रमण भगवान महावीरांच्या एकत्व निष्ठेचा दृष्टांत देऊन मुनींना एकत्वभावनेचे चिंतन-मनन करण्याचे आणि एकत्वाचे अनुसरण करण्याचा बोध दिला आहे.
भगवान महावीरांनी आपल्या स्वजनांचा स्नेह सोडून दीक्षा घेतली. दीक्षेच्या पहिल्या दिवशीच कुमारगावाच्या बाहेर कायोत्सर्ग ध्यान करीत असताना कोण्यापापी गवळ्याने सांगितले की मी जोपर्यंत घरी जाऊन परत येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या ह्या बैलांचे रक्षण करा, असे सांगून गवळी निघून गेला. प्रभू तर ध्यानात मग्न होते. बैल तिथून निघून गेले. थोड्यावेळाने गवळी परत आला आणि तेथे बैल न दिसल्याने भगवंतांना विचारले माझे बैल कोठे गेले ? प्रत्युत्तर काहीच मिळाले नाही त्यामुळे गवळी दुःखी झाला आणि तो सर्वत्र बैलांना शोधू लागला. बैलसुद्धा चरून खूप वेळाने प्रभुंजवळ आले. गवळीसुद्धा रात्रभर भटकून तेथे आला. बैलांना प्रजवळ पाहून विचार केला की नक्कीच ह्यांनी बैलांचे हरण करण्यासाठी त्यांना लपवून ठेवले होते. अन्यथा मी विचारल्यानंतर उत्तर का दिले नाही ? असा विचार मनात आल्याने त्याला खूप राग आला आणि प्रभूना मारण्यासाठी धावला. त्याचवेळी सौधर्मेन्द्र अवधिज्ञानाने प्रभूची अशी अवस्था पाहून त्वरितच स्वर्गातून खाली उतरला आणि गवळ्याचा तीव्र तिरस्कार केला. प्रभूना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करून भक्तिभावाने म्हणू लागला,
आजपासून बारा वर्षापर्यंत आपणास खूप उपसर्ग येतील' म्हणून तुम्ही मला आज्ञा द्या की मी दुसरी सर्व कामे सोडून तुमच्याजवळच राहिन. मी मनुष्य, तिर्यंच आणि देवांद्वारे आलेल्या उपसर्गाचे निवारण करीन,. तेव्हा प्रभुंनी सांगितले - हे देवेन्द्रा, तू जे सांगतो तसे कधी होत नाही किंवा झाले नाही आणि होणारही नाही. संसारात भ्रमण करणाऱ्या जीवाने स्वतः स्वेच्छेने जे कर्म बांधून घेतले आहे. त्याचा क्षय ते कर्म भोगल्याशिवाय अथवा कठीण तपस्या केल्याशिवाय होत नाही. दुसऱ्याच्या मदतीमुळे त्याची निर्जरा होत नाही. कर्माधीन झालेला जीव एकटाच सुखदुःखाचा अनुभव घेतो. इतर तर केवळ त्याच्या कर्मानुसारच उपकार किंवा अपकार करण्यास निमित्तमात्र होतात. प्रभुंनी असे सांगितल्यावर इंद्र नतमस्तक झाले आणि त्रिभुवन नाथ प्रभुंनीसुद्धा एकट्यांनीच स्वेच्छेपूर्वक कठीण परिसह सहन केले. अशाप्रकारे जर चरम तीर्थंकर श्री महावीर प्रभुंनी एकट्यांनीच दुःख सहन केलीत तर हे क्षपक मुनी ! तू एकत्व भावनेचे चिंतन करणारा का होत नाहीस ? अशाप्रकारे स्वजन इत्यादी विविध बाह्य वस्तूंचा संयोग झाला तरी तत्त्वत: जीव एकटाच आहे. जीवाचे एकत्व आहे असे चिंतन कर. १२८