________________
(३५०)
क्षेत्र एकत्व - आकाशाच्या एका परमाणूंच्याद्वारा आवृत्त केलेला जितका प्रदेश ते क्षेत्र एकत्व आहे.
काल एकत्व - एक क्षण इतका काळ म्हणजे कालएकत्व आहे. भाव एकत्व - मोक्षमार्ग निश्चय नयाने भाव एकत्व आहे. १२४
सम्यग्दृष्टी जीवाला देह तुरुंगासारखा वाटतो. तुरुंगात साखळदंडाने अथवा दोरीने बांधलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे तुरुंगाविषयी ममत्व राहत नाही, त्याचप्रमाणे सम्यग् ज्ञानी मनुष्याला देहाची आसक्ती राहत नाही. त्यांना हे कळून चुकते की, ह्या शरीरामुळे धन, कुटुंब यांविषयी अभिमान उत्पन्न होऊन घोर बंधनात पराधीन होऊन दुःख भोगावी लागतात. आपल्या यथार्थ स्वरूपाला सोडून परद्रव्य परिग्रहाला आपले मानल्याने अनंतकाळापर्यंत संसारात परिभ्रमण करावे लागेल आणि एकट्यालाच अन्य गतींमध्ये जाऊन जन्म घ्यावे लागतील. त्यावेळी कर्माशिवाय दुसरे काहीच बरोबर जात नाही. मात्र पाप, पुण्य, धर्म आणि कर्मच बरोबर येतात.१२५
ज्यांना माहीत आहे की समोर विहिर आहे तर त्यात कोणीही मुद्दाम पडणार नाही. त्याचप्रमाणे सम्यग् ज्ञानी संसाराची असारता आणि एकत्वामध्ये सार दिसल्याने तो सार ग्रहण करण्याचाच विचार करतो आणि असारामध्ये कोणीच जात नाही.
बृहद् द्रव्यसंग्रहाच्या वृत्तीमध्ये श्री ब्रह्मदेव यांनी लिहिले आहे की, निश्चय रत्नत्रयरूपी एका लक्षणाचा धारक जो एकत्व आहे त्याची भावना करण्यात मग्न झालेल्या जीवाला निश्चय नयाने सहजानंद सुखादी अनंतगुणांचे आधाररूप केवलज्ञान सहज प्राप्त होते. ते एकच आहे. तसे तर ज्ञानाचे पाच भेद आहेत. परंतु केवलज्ञान झाल्यानंतर अन्य सर्व ज्ञान गौण होते. आर्त रौद्र ध्यान न राहता परम सामायिक रूप एकत्वभावनेमध्ये परिणत झालेले जे आत्मतत्त्व आहे ते अविनाशी आणि परम हितकारी असे आहे. पुत्र, मित्र, कलत्र इत्यादी कोणीच हितकारी नाही. अशा रूपात अवस्थित आत्मा सर्वथा एकाकी आहे आणि सर्व वैभाविक दशा आहेत. एकत्व भावनेचे हे तात्त्विक तात्पर्य आहे. १२६
आपल्या आत्म्यामध्ये एकाग्र होऊन शुद्ध निश्चय नयाची भावना करता करता अनन्तज्ञानमय आत्मस्वरूपाची भावना केली पाहिजे. त्याच्याशिवाय बाह्यपदार्थ बंधाचे कारण आहेत. एका आत्म्याशिवाय अन्य कोणीच आपले सहायक नाही.१२७ म्हणून कठोर उपसर्गाच्या दुःखातसुद्धा मुनी दुसऱ्यांच्या सहकार्याची इच्छा ठेवत नाही. परंतु श्री महावीर प्रभूप्रमाणे स्वतः सर्वकाही सहन करतात.