________________
sansh
(३४९)
एकटाच आहे, मी सर्वप्रकारे एकटा आहे, मी निर्ममत्वी आहे, माझे कोणीच नाही, मी कोणाचा नाही, मी शुद्ध आहे, सम्यक् दर्शन, सम्यक ज्ञान हे माझे लक्षण आहे. शुद्धत्व हेच एकमेव माझे उपादेय आहे. शुद्धात्म स्वरूपाला प्राप्त करणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे.१२०
__ आचार्य उमास्वाती यांनी संसाराला 'भवर' म्हणून संबोधिले आहे. समुद्रामध्ये पाणी जेथे गोल गोल चक्रासारखे फिरून खाली जाते त्याला 'आवर्त' अर्थात 'भवर' म्हणतात. संसाररूपी समुद्रातही जीव जेथे जन्म घेतो अथवा मरतो त्याला 'भव अथवा आवर्त' म्हणतात. त्या भवरूपी आवर्तामध्ये जन्ममरण करताना जीवाबरोबर कोणीही जात नाही. त्याला कोणीही सहायरूप होत नाही. मेल्यानंतर नरकादी गतींमध्ये आपल्या कर्माचे फळ एकटाच भोगतो. जीवासाठी हितकर संयमाचे पालन करणे अथवा त्याद्वारे प्राप्त होणारा मोक्षच आहे जो कधीही नष्ट होत नाही म्हणजे हा जीव एकटाच कष्ट भोगतो तर त्याला एकट्यालाच आपल्या आत्म्यासाठी हित साधले पाहिजे.१२१
इथे जीव ज्यांना माझे स्वजन, परिजन म्हणतो त्यातले कोणीही असे नाही की जे व्याधी, जरा, मृत्यू इत्यादींच्या दुःखाला दूर करू शकतील. संपूर्णच काय अंश अथवा अंशांशाला दूर करण्यात अथवा वाटून घेण्यातही कोणीच समर्थ होऊ शकत नाही. ज्या कर्माचा बंध मी केला त्याच्या फळाचा अनुभव करणारा सुद्धा मी एकटाच आहे. अशाप्रकारे आपल्या एकाकीपणाचे चिंतन केले पाहिजे.
जो मुमुक्षू सतत अशा प्रकारचे चिंतन करीत राहतो त्याला स्वजनांबद्दल आसक्ती राहत नाही आणि त्यामुळेच तो त्याच्या निमित्ताने पापकर्म करण्यापासून पराङ्मुख होतो अथवा विषयांपासून विरक्त होतो. त्याचप्रमाणे त्याला परजन इत्यादींबद्दल द्वेषसुद्धा वाटत नाही. त्यांना पर समजून त्यांचे अकल्याण करण्यातही प्रवृत्त होत नाही. म्हणून तो कोणावर प्रेम करीत नाही किंवा द्वेषही करीत नाही, फलस्वरूपी एकत्वाचा चिंतक रागद्वेषरहित होऊन निःसंगतेला प्राप्त होतो आणि तो मोक्षासाठीच प्रयत्न करीत राहतो.१२२
तो चिंतन करतो की बंधुबांधव आणि मित्र स्मशानाच्या पुढे बरोबर येत नाही. धर्मच नेहमी बरोबर राहणार आहे, धर्माची साथ कधीही सुटत नाही.१२३
एकत्वाचे द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव हे चार भेद आहेत - द्रव्य एकत्व - प्रत्येक जीव इत्यादी द्रव्य एकत्व आहे.