________________
(३४७)
सहाय प्रत्याख्यान म्हणजे संयमी जीवनामध्ये दुसऱ्या कोणाचा आश्रय न घेणे. त्याने साधक एकत्व भावाला प्राप्त होतो. एकत्वभावाला प्राप्त साधक एकाग्रतेची भावना करता करता विग्रह युक्त शब्द, वाक्कलह, कलह, कषाय आणि तू-तू-मी-मी इत्यादींपासून सहजपणे मुक्त होतो. संयम आणि संचरामध्ये पुढे जाता जाता समाधीअवस्थेत जातो.११७
श्रमण भगवान महावीर स्वामी गौतम गणधरांना सांगतात - हे इंद्रभूती ! संसारी आत्मा, संसाराच्या प्रपंचात फसून दुसऱ्यासाठी आणि स्वतःसाठी जो दुष्ट कर्मे करतो त्या कर्माची फळे जेव्हा भोगावी लागतात तेव्हा त्यांच्यासाठी ती दुष्ट कर्मे केली ते बंधुबांधव, मित्र, सगेसोयरे पापाचे भागीदार होण्यास येत नाहीत.११८ ज्या आत्म्याने कर्म केले तो आत्मा एकटाच त्याचे फळ भोगतो. येथे केलेली कर्मे मत्यूनंतर त्याच्याच बरोबर जातात. आत्म्याचा सोबती त्याचे स्वतःचे कर्मच असते. कर्मामुळेच जीव परवश होता होता स्त्री, पुत्र, हत्ती, घोडे, शेत, घर, रुपये-पैसे, धान्य, चांदी, सोने इत्यादी सर्वांना मृत्यूच्या विळख्यात सोडून स्वतःच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे स्वर्ग किंवा नरकामध्ये जातो.११९
एकत्वभावनेचे विवेचन सर्वाधिक रूपात आगम ग्रंथात प्राप्त होते. कारण हीच भावना अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत मनुष्य मी एकटाच कर्माचा कर्ता आणि भोक्ता आहे हे समजणार नाही तोपर्यंत तो संसाराच्या मोह मायेचा त्याग करू शकणार नाही. आणि मोहरूपी कर्मच सर्व कर्मांचा राजा आहे. एक मोहरूपी कर्म नष्ट झाले तर बाकीची सात कर्मे नष्ट करायला वेळ लागणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे एक करोड रुपयांचे देणे आहे आणि तो ९९ लाख ९९ हजार ९९९ रुपये देणे देतो. नंतर केवळ एक रुपयाचे देणे राहिले असेल तर तो ते एकदम सहजपणे फेडू शकतो, त्याचप्रमाणे ज्याने मोहनीय कर्माला नष्ट केले आहे त्याला अन्य सात कर्मे नष्ट करणे एकदम सोपे आहे. ही एकत्व भावना मोहनीय कर्माच्या आवरणाला दूर करण्यासाठी वज्रासारखी आहे. आणि ह्या मोहाला दूर करण्यासाठी अनेक ग्रंथात वेगवेगळ्या शैलीने जीवाच्या एकत्वाला समजविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आचार्य कुंदकुंद यांनी एकत्व भावनेचे अत्यंत प्रेरक शब्दात वर्णन करताना लिहिले आहे - जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्याबरोबर कोणी येत नाही. हीच गोष्ट मृत्यूची आहे की कोणीही कोणाबरोबर मरत नाही. सर्वकाही सोडून एकट्यालाच जावे लागते.