________________
(३४६)
झाली आहे, सामर्थ्य क्षीण झाले आहे. तो पराधीन झाला आहे, त्याला पिंजऱ्यातल्या पाखराप्रमाणे आकाशातील स्वतंत्र हवेचा अनुभव नाही. हे सर्व समजविण्यासाठीच एकत्व भावना आहे. ह्या भावनेचे चिंतन केल्याने आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले तर त्याला प्राप्त करण्याचा मार्ग तो स्वतःच शोधू शकतो.
संसार परिभ्रमण करतानाही आपल्या आत्म्याच्या एकाकीपणाचा पुन्हा पुन्हा विचार करणारा, निःसङ्गतेची सिद्धी आणि मोक्ष पुरुषार्थाचे साधन प्राप्त करतो. त्या साधनाला साध्य करण्यासाठी सर्वप्रथम आत्म्याला विभाव देशेतून स्वभाव दशेत आणण्यासाठी स्वरूप बोधाची आवश्यकता आहे. स्वरूपबोध झाल्यानंतर अनादी संबंधालाही तोडले जाऊ शकते. जसे दुधात तूप एकत्रित असते परंतु विरझण किंवा दही मंथन करण्यासाठी, मंथन करण्याचे साधन, मंथन करण्यासाठी लागणारे भांडे, ह्या साधनांचा योग मिळाल्यानंतर तूप ताकरूपी संयोगाला सोडून आपल्या मूळ स्वरूपात विलग होते. त्याचप्रमाणे ज्ञानदर्शनादी चार साधनांच्या योगाने आत्म्याला कर्ममळापासून विलग करून ह्या अनादी संबंधाला तोडले जाऊ शकते आणि आत्म्याला एकत्वभावामध्ये प्रतिष्ठित केले जाऊ शकते.११५
साधकाने स्वत:ला पर तत्त्वापासून भिन्न समजून आत्मकेंद्रित होण्याचा अभ्यास केला पाहिजे. वस्तुत: ज्या संबंधांना त्याने आपले मानले आहे त्यांच्या मोहातून तो सहजपणे सुटू शकत नाही तरी एकत्वभावनेच्या निरंतन चिंतनाने, अभ्यासाने आत्म्यात अनासक्त भावनेचा प्रकाश पसरेल आणि एक दिवस तोच प्रकाश जीवाला सर्वकाही सोडण्यासाठी तयार करेल. परंतु एकत्व आणि अनेकत्वावर विचार करण्याची आवश्यकता
आहे.
आगम ग्रंथातील प्रथम अंगसूत्र आचारांग याचे "एगो अहंमसि ण मे अत्थि कोइ ण वाऽहमवि कस्सवि"११५ अर्थात मी एक आहे, एकटा आहे कोणी माझा नाही किंवा मी कोणाचा नाही हे सूत्र एकत्व आणि अन्यत्व भावनेचा निर्देश करते.
___ ज्यांना ध्रुव बनायचे आहे त्यांनी सतत ह्या भावनेचे चिंतन अनुभावन करणे आवश्यक आहे. ह्या चिंतनाने आत्मा पूर्ण स्वतंत्र आणि सिद्ध होऊ शकतो. मुमुक्षुने उपकरण, आहार, शरीर, संघ, आणि सहकारी इत्यादींनी निरपेक्ष राहून एकमात्र आत्मावलंबी होऊन जीवन व्यतीत करावे. समाधी मरणाच्या तयारीसाठी सहायविमोक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उत्तराध्ययन सूत्रामध्ये सहायप्रत्याख्यान शब्द विशेषतः एकत्वाच्या अर्थाने घेतला आहे.