________________
(३३४)
ब्राह्मण अर्थात कर्मकांडाचा अधिकारी, स्पृश्य-अस्पृश्यता मानणारा ब्राह्मण मरून कृमी किंवा चांडाळ होतो.९८
उपाध्याय विनयविजय यांनी संसारभावनेच्या गितिकेमध्ये साधकाला संबोधून सांगितले आहे, हे जीवा ! थोडा विचार कर - हा संसार किती भयंकर आहे, ह्यामध्ये जन्म-मरण इत्यादींचे भीषण भय आहे, मोहरूपी शत्रूने तुमचा गळा पकडून ठेवला आहे, तुमच्या पावलोपावली संकटे आहेत, स्वजनांबरोबर असलेले तुमचे संबंध स्पष्टच आहेत. तुम्हाला नवीन नवीन अनुभव, तिरस्कार पराभव प्राप्त होत असतो. तरीही त्याचा तुम्ही विचार करीत नाही. हा संसार किती विचित्र आहे. भव परिवर्तनाबरोबरच शत्रू मित्र होतो आणि स्नेही द्वेषी होतो. हा संसार भयंकर चिंतेच्या आणि रोगांच्या अग्नीत जळत आहे. तुम्ही त्यातच अनुराग ठेवता. त्याच्या दारुणतेवर चिंतन करा आणि आपल्या मनामध्ये जिनवचनाचे चिंतन करा त्याने संसाराच्या सर्व भयाचा नाश होईल.९९
ह्या संसाराच्या विचित्रतेला जे चांगल्याप्रकारे समजून घेतात आणि त्यापासून विरक्त होतात ते वर्द्धनकुमारादी भरतचक्रवर्तीच्या नऊशे तेवीस पुत्रांप्रमाणे मोक्षाचे अधिकारी होतात.
अनादी काळचे मिथ्यादृष्टी असे नऊशेतेवीस नित्य निगोदचे निवासी निगोदामध्ये कर्माची निर्जरा झाल्याने ते 'इंद्रगोप' नावाचे कीडे झाले आणि त्या किड्यांच्या ढीगावर भरतचक्रवर्तीच्या हत्तीने पाय ठेवल्याने ते मरून गेले व मेल्यानंतर भरतमहाराजांच्या वर्द्धनकुमारादी पुत्राच्या रूपात जन्मले. परंतु ते कोणाबरोबरही बोलत नव्हते म्हणून भरतमहाराजांनी समवसरणात भगवान ऋषभदेवांना विचारले तर त्यांनी पूर्वीचा सर्व वृत्तांत ऐकवला. तो ऐकून नऊशेतेवीस वर्द्धनकुमारादी पुत्रांनी संयम व तप ग्रहण केले आणि अत्यंत अल्प काळात ते मोक्षास पोहचले.
ज्ञानी पुरुषांनी ह्या संसाराचे चांगल्याप्रमाणे निरीक्षण करून सत्यच सांगितले आहे की, "संसार दुःखमय आहे.' परंतु केवढे आश्चर्य आहे की, असंख्य दुःखाचे काटे टोचले, अंगाचे छेदन झाले, तरीसुद्धा संसारी मनुष्याला दुःखप्रेरित वैराग्यसुद्धा लवकर प्राप्त होत नाही. जणू कंटकपूर्ण संसारात राहून त्याने कंटकमय दुःसह दुःखालासुद्धा कायमचे पचवून टाकले आहे असे वाटते.
"संसारम्मि असारे नत्थि सुखं वाहिवेयणा पउरे । जाणतो इह जीवो न कुनई जिण देसि धम्मं ॥१००