________________
(२८७)
तो ज्याला नित्य, शाश्वत अथवा ध्रुव मानत आहे ते सर्वकाही अनित्य आहे. म्हणून ''अध्रुव' अथवा अनित्य भावनेला सर्वप्रथम स्थान दिलेले आहे. कारण सर्व दुःखाचे मूळ कारण मोहच आहे. मोहाचा क्षय होताच दुःख, चिंता, अधिव्याधी नष्ट होतात.
ह्या विश्वामध्ये जे कोणतेही दृश्यमान पदार्थ आहेत ते सर्व अनित्य, अध्रुव आहेत. उत्तम घर, वाहन, शयनासन, आई-वडील, स्वजन, सेवक, निरनिराळ्या प्रकारचे भौतिक वैभव, साजसामग्री, यौवन, बल, तेज, सौभाग्य, लावण्य हे सर्व काही इंद्रधनुष्याप्रमाणे अशाश्वत आहे. जसे इंद्रधनुष्य आकाशामध्ये थोडावेळ भासमान होते आणि नंतर ते विलुप्त होते हिच स्थिती या सुंदर सुखद दिसणाऱ्या पदार्थांची आहे. ११
इष्ट जनांचा संयोग ऋद्धी, वैषयिक सुख, धन, आरोग्य, शरीर, जीवन इत्यादी सर्व अनित्य आहे. १२
कोणत्याही प्रिय व्यक्तीचा अथवा वस्तूचा संयोग झाला तर त्याने स्नेहाचा बंध होतो, त्यातच तो रममाण होतो. जीवात्मा विचार करतो की आमचा हा संबंध अखंड राहील. परंतु कच्च्या दोऱ्याप्रमाणे जेव्हा सर्व संबंध तुटतात तेव्हा प्राणी दुःखी होतो म्हणून "संयोगाः वियोगान्ता" अर्थात सर्व संयोग शेवटी वियोगात बदलणारे आहेत ह्या सत्याला पुन्हा पुन्हा दृढ केले पाहिजे. असे चिंतन केल्याने राग उत्पन्न होणार नाही.
आचार्य वट्टकेर लिहितात की, 'स्थान, आसन, सूर असूर आणि मानवाची विभूती, संपत्ती, सौख्य, कुटुंबातील लोकांचा सहवास आणि त्यांचे प्रेम, ममता हे सर्व काही अनित्य आहे.'
इथे जो 'स्थान' शब्द वापरला आहे ते गाव, शहर, जनपद, देश, पर्वत नदी इत्यादींचा सूचक आहे. अथवा 'स्थान' याचा अर्थ देवेंद्र, चक्रवर्ती, सम्राट, बलदेव वासुदेव इत्यादी होतो किंवा इक्ष्वाकू वंश इत्यादी उच्चकुळाच्या अर्थाने घेतला आहे.
'आसन' शब्दाचा अभिप्राय राज्यादी सत्तामूलक वैभवाचे अंगभूत सिंहासन इत्यादी आहे. ‘आसन' याचा दुसरा अर्थ 'अशन' सुद्धा घेतला आहे. वृत्तिकार सिद्धांत चक्रवर्ती वसुनंदींचे सांगणे आहे की पुढील गाथेमध्ये पुन्हा 'आसण' शब्द आला आहे. त्यातील एकाचा अर्थ 'ज्यामध्ये सुखाने प्रवेश करू शकतो' किंवा 'सुखाने बसू शकतो ते आसन' होय तर दुसरे आसण, अशन म्हणजे नाना प्रकारचे भोजन इत्यादी अर्थ घेतला
आहे.