________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५५९
श्लोक ३ :- सागर सोडून जे स्वत:ला तटावर फेकतात, त्या शंखांचा अस्पृश्य संसर्ग आहे; केवळ (दुसऱ्याकडून) फुकले जात, ते भ्रमण करतात. छड्डविणु -- सू.४.४४० . छ हा मुच् धातूचा आदेश आहे (सू.४.९१).
घल्ल -- (दे) (म) घालणे. विट्टाल -- (म) विटाळ.
श्लोक ४ :- मूर्खा! दिवसात जे मिळेल ते खा; एक पैसा (द्रम्म) सुद्धा साठवू नको. कारण असे काहीतरी भय येते की ज्याने जन्माचाच शेवट होतो.
वढ -- सू.४.४२२.१२ नंतर पहा. द्रवक्कउ -- द्रवक्कला सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ प्रत्यय लागला आहे.
श्लोक ५ :- जरी चांगल्या प्रकारे, सर्वादरपूर्वक, हरी एकेकाकडे पहातो, तरी जेथे राधा आहे, तेथे त्याची दृष्टी जाते. स्नेहाने भरलेले डोळे रोखण्यास कोण समर्थ आहे ?
राही -- सू.४.३२९ नुसार राधा मधील स्वरात बदल झाला. संवरेवि -- सू.४.४४१. पलुट्टा -- पलोट्ट (सू.४.२५८) मध्ये ओ चा उ झाला.
श्लोक ६ :- वैभवात स्थिरता कुणाची? यौवनात गर्व कुणाचा? (म्हणून) जो खोलवर बिंबेल (श - लागेल) असा लेख पाठविला जात आहे. थिरत्तणउं -- थिर ला सू.२.१५४ नुसार त्तण प्रत्यय लागला; मग त्यापुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ आला. मरट्ट -- (दे) गर्व. लेखडउ -- सू.४.४३० नुसार स्वार्थे प्रत्यय आला.
श्लोक ७ :- कुठे चंद्र, कुठे समुद्र ? कुठे मोर, कुठे मेघ ? सज्जन जरी दूर असले, तरी त्यांचा स्नेह असाधारण असतो. -- येथे असड्ढल - - असाधारण.