________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५४१
सू.४.३७८. तेवड्डउ -- सू.४.४०७ नुसार तेवड, मग ड चे द्वित्व होऊन तेवड्ड, पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ प्रत्यय आला.
३७२ श्लोक १ :- भूमंडलावर जन्म घेऊन, इतरे जनांनी तुझी गुणसंपदा, तुझी मती व तुझी अनुपम क्षमा शिकावी (श-शिकतात).
येथे तउ, तुज्झ व तुध्र हे युष्मद् च्या ष.ए.व. तील आदेश आहेत. हेमचंद्राने ष.ए.व. चा तुज्झ आदेश दिला आहे. श्लोक १ मध्ये तुज्झ चा पाठभेद तुज्झु असा आहे. ४.३७०.४ श्लोकात तुज्झु असून, त्याचा पाठभेद तुज्झ आहे. ४.३६७.१ मध्ये तुज्झु असेच आहे; तेथे पाठभेद नाही. तेव्हा युष्मद् च्या ष.ए.व. मध्ये तुज्झु असेही रूप होते असे दिसते. मदि -- सू.४.२६०, ४४६.
३७५ तसु....दुल्लहहो -- येथे अस्मद् च्या प्र.ए.व. मध्ये हउं आदेश आहे.
३७६ श्लोक १ :- (रणांगणावर जाताना एक योद्धा आपल्या प्रियेला उद्देशून हा
श्लोक उच्चारतो) :- आपण थोडे, शत्रू जास्त, असे भित्रे (लोक) म्हणतात. सुंदरी (मुग्धे)! आकाशात पहा. (तेथे) किती लोक (तारे) चांदणे देतात ? (उत्तर - फक्त चंद्रच).
येथे प्र.अ.व.मध्ये अस्मद् ला अम्हे आदेश आहे. एम्व -- सू.४.४१८. निहालहि -- (म) न्याहाळणे.
श्लोक २ :- (एक विरहिणी प्रवासाला गेलेल्या आपल्या प्रियकराबद्दल म्हणते) :- प्रेम (अम्लत्व) जोडून जे कोणी परकीय पथिक (प्रवासाला) गेले आहेत, ते अवश्य आमच्याप्रमाणेच सुखाने झोपू शकणार नाहीत.
येथे अस्मद् च्या प्र.अ.व. मध्ये अम्हइं आदेश आहे. लाइवि -- सू.४.४३९. अवस -- सू.४.४२७. अम्हे....देक्खइ -- येथे अस्मद् च्या द्वि.अ.व. मध्ये अम्हे, अम्हइं हे आदेश आहेत.
३७७ श्लोक १ :- प्रियकरा! मला वाटत होते की विरही जनांना संध्याकाळी