________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५१७
४.२७७ दाणिं -- इदानीम् मधील आद्य इ चा लोप झाला.
४.२७९
येथे सांगितलेला णकाराचा आगम हे शौरसेनीचे एक वैशिष्ट्य आहे. या नवीन आलेल्या ण् मध्ये पुढील इ वा ए मिसळतात. उदा. जुत्तं ण् इमं = जुत्तं णिमं.
४.२८१ निपात -- येथे निपात शब्दाचा अव्यय हा अर्थ आहे.
४.२८२
हगे -- सू. ४.३०१.
४.२८४
भवं -- सू. ४.२६५.
४.२८६
अन्दावेदी जुवदिजणो -- सू.१.४. मणसिला -- सू. १.२६, ४३.
४.२८७-४.३०२ या सूत्रांत मागधी भाषेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
४.२८७
अकारान्त पुल्लिंगी नामांचे प्र.ए.व. एकारान्त असणे, हे एक मागधीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एशे मेशे, पुलिशे -- स (व ष) चा श आणि र चा ल यासाठी सू. ४.२८८ पहा. यदपि....लक्षणस्य -- जैनांची जुनी सूत्रे (सूत्रग्रंथ) अर्धमागधी भाषेत आहेत, असे वृद्ध व विद्वान जनांनी म्हटले आहे. या अर्धमागधीशी मागधीचा संबंध फार थोडा आहे. मागधीचे बाबतीत सांगितलेला सू.४.२८७ एवढाच नियम अर्धमागधीला लागतो; नंतरच्या सूत्रांत सांगितलेली मागधीची वैशिष्ट्ये अर्धमागधीत नाहीत.
४.२८८ र चा ल आणि स (ष) चा श हे मागधीचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे.
दन्त्यसकार -- दन्त या उच्चारणस्थानातून उच्चारला जाणारा सकार.