________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४४५
१.१७६-२७१ या सूत्रात अनादि असंयुक्त व्यंजनांचे विकार सांगितलेले आहेत.
१.१७६ हे अधिकारसूत्र आहे. प्रस्तुतचा प्रथम पाद संपेपर्यंत या सूत्राचा अधिकार
आहे.
१.१७७ स्वरापुढील अनादि, असंयुक्त क्, ग्, च्, ज्, त्, द्, प्, य, व् यांचा
लोप होतो, हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे. प्रायो लुग् भवति -- या संदर्भात मार्कंडेयाचे म्हणणे लक्षणीय आहे :प्रायोग्रहणतश्चात्र कैश्चित्प्राकृतकोविदः। यत्र नश्यति सौभाग्यं तत्र लोपो न मन्यते।। (प्राकृतसर्वस्व, २.२). असा थोडा प्रकार प् च्या बाबतीत हेमचंद्र सू.१.२३१ वरील वृत्तीत सांगतो. विउहो -- विबुध मधील ब् चा व् होऊन, मग व् चा लोप झाला, असे समजावयाचे आहे. समासे....विवक्ष्यते -- समासातील दुसरे पद हे भिन्न आहे, अशी विवक्षा असू शकते. त्यामुळे संपूर्ण समास. एकच पद मानल्यास, दुसऱ्या पदाचे आदि व्यंजन हे अनादि होईल; पण दुसरे पद भिन्न मानल्यास, त्याचे आदि व्यंजन हे आदिच मानले जाईल. या मानण्यानुसार त्या व्यंजनाची द्विविध वर्णान्तरे, वाङ्मयीन प्रयोगात आढळेल त्याप्रमाणे होतील. उदा. जलचर समासात च आदि मानल्यास, जलचर वर्गान्तर होईल; च अनादि मानल्यास, जलयर. इन्धं -- सू.२.५० पहा. कस्य गत्वम् -- (माहाराष्ट्री) प्राकृतात कधी क चा ग होतो. त्या संदर्भात हेमचंद्र ४.४४७ सूत्राचा हवाला देतो. अर्धमागधीमध्ये अनेकदा क चा ग होतो.
१.१७८ अनुनासिक -- मुख व नासिका यांचे द्वारा उच्चारला जाणारा वर्ण
म्हणजे अनुनासिक. आता, येथे म्हटल्याप्रमाणे, म् चे अनुनासिक झाल्यावर, उध्दृत्त स्वराचा उच्चार सानुनासिक (अनुनासिकासह) होणार; हा उच्चार त्या अक्षरावर हे चिन्ह ठेवून दाखविला जातो. उदा. जउँणा.