________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४३५
१.४३ प्राकृतलक्षण -- प्राकृत व्याकरण. याद्याः (य् + आद्याः) य् इत्यादी.
म्हणजे सूत्रात सांगितलेले य, र, व इत्यादी वर्ण. उपरि अधो वा -- संयुक्त व्यंजनात प्रथम अवयव किंवा द्वितीय अवयव असणे. या सूत्रात, य् इत्यादी व्यंजनांची पुढील संयुक्त व्यंजने विचारात घेतली आहेत:- श्य, श्र, श, श्व, श्श; ष्य, र्ष, ष्व, ष्ष; स्य, स्र, स्व, स्स. तेषामादे....भवति -- संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप झाल्यावर, त्याच्या लगेच पूर्वी असणारा ह्रस्व स्वर दीर्घ होतो. त्यामुळे शब्दातील मात्रा कायम रहातात. उदा. पश्यति - पस्सइ - पासइ. न दीर्घानु....द्वित्वाभाव :'अनादौ.... द्वित्वम्' (सू. २.८९) या सूत्रानुसार, संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप झाल्यावर उरलेल्या अनादि व्यंजनाचे द्वित्व होते. उदा. अर्क - अक्क. पण संयुक्त व्यंजनाच्या लगेच मागे दीर्घ स्वर असेल, तर हे द्वित्व होत नाही, असे 'न दीर्घानुस्वारात्' (सू. २.९२) या सूत्रात सांगितले आहे. उदा. ईश्वर - ईसर. आता, प्रस्तुत ठिकाणी श्व इत्यादी संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप झाल्यावर, लगेचचा मागील स्वर दीर्घ होत असल्याने, इथे दिलेल्या उदाहरणांत साहजिकच द्वित्वाचा अभाव आहे.
१.४४-१२५ प्राकृतात अ, आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर आहेत. तथापि ते ज्या
संस्कृत शब्दांत असतात, त्यातील काहींचे वर्णान्तर होताना, या स्वरांमध्येही काही विकार होतात. त्यापैकी अ चे विकार सू.१. ४४-६६, आ चे विकार सू.१. ६७-८३, इ चे विकार सू.१. ८५-९८, ई चे विकार सू.१. ९९-१०६, उ चे विकार सू.१. १०७-११७ व ऊ चे विकार सू.१. ११८-१२५ या सूत्रांत सांगितलेले आहेत.
१.४४ आकृतिगणो....भवति -- सदृश रूपे होणाऱ्या शब्दसमूहाचा गण
केला जातो. त्यातीलच एका शब्दावरून त्या गणाला नाव दिले जाते. उदा. समृद्धयादि गण. समृद्धयादि हा आकृतिगण आहे. ज्या गणातील