________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४२९
स्वराचा मागील स्वराशी संधी झालेला नाही. अत एव....भिन्नपदत्वम् -- समासातील दुसरे पद कधी स्वतंत्र मानले जाते, तर कधी संपूर्ण सामासिक शब्द हा एकच पद मानला जातो.
१.९ तिबादीनाम् -- सूत्रातील त्यादेः चा अनुवाद या शब्दात आहे. त्यादि
किंवा तिबादि म्हणजे धातूंना लागणारे काळ-अर्थांचे प्रत्यय. 'तिप्तस्झिसिप्....महिङ् (पा. अ. ३.४.७८), असे हे प्रत्यय आहेत. त्यातील आदि ति किंवा तिप् यांवरून त्यादि किंवा तिबादि (तिप्+आदि) ही संज्ञा बनली आहे. होइ इह -- येथे होइ या धातुरूपातील इ व पुढील इ यांचा संधी झालेला नाही.
१.१० लुग् (लुक्) -- लोप. प्रसंगवशात् उच्चारात प्राप्त झालेल्या वर्ण इत्यादींच्या
श्रवणाचा अभाव (अदर्शन) म्हणजे लोप. तिअसीसो - तिअस+ईस. तिअस मधील अन्त्य अ चा लोप झाला आहे. नीसासूसासा - (नीसास+ऊसासा) नीसासमधील अन्त्य अ चा लोप झाला आहे.
१.११ अन्त्य -- शेवटचा. शब्दातील वर्णांची स्थाने ठरविताना, प्रथम वर्णांची
फोड करून, उच्चारानुसार त्यांचे स्थान ठरविले जाते. उदा. केशव = क्+ए+श्+अ+व+अ. येथे क् आदि आहे, अ अन्त्य आहे; बाकीचे वर्ण अनादि (किंवा मध्य) आहेत. मरुत् मध्ये त् हे अन्त्य व्यंजन आहे. समासे.... भवति -- संस्कृतमधील समासात, पहिल्या पदाचे अन्त्य व्यंजन हे कधी अन्त्य मानले जाते, तर कधी ते अन्त्य मानले जात नाही; मग त्या त्या मानण्यानुसार, योग्य ते वर्णान्तर होते. उदा. सद्भिक्षु या समासात, द् अन्त्य मानल्यास त्याचा प्रस्तुत सूत्रानुसार लोप होऊन, सभिक्खु असे वर्णान्तर होईल. याउलट, द् अन्त्य मानला नाही तर, सद्भिक्षु चे सू. २.७७ नुसार सब्भिक्खु असे वर्णान्तर होईल. सभिक्खू, एअगुणा -- येथे पहिल्या पदाच्या अन्त्य व्यंजनाचा लोप झाला आहे. सज्जणो, तग्गुणा -- येथे पहिल्या पदाचे अन्त्य व्यंजन अन्त्य न मानता, वर्णान्तर केलेले आहे.