________________
४२२
टीपा
संस्कृतानन्तरं... ज्ञापनार्थम् -- संस्कृतनंतर प्राकृतचा आरंभ कशासाठी? या प्रश्नाला येथे उत्तर दिले आहे. प्राकृत म्हणजे प्राकृतमधील शब्दसंग्रह हा संस्कृतसम (तत्सम), संस्कृतभव (तद्भव) आणि देशी/देश्य शब्द असा तीन प्रकारचा आहे. तत्सम शब्दांचा विचार मागे दिलेल्या संस्कृत व्याकरणात झाला असल्याने, तो पुन: येथे करण्याचे कारण नाही, असे हेमचंद्र याच सूत्राखाली 'संस्कृतसमं तु संस्कृतलक्षणेनैव गतार्थम्' या शब्दांत सांगतो. देश्य शब्दांचा विचार हेमचंद्र येथे करीत नाही. कारण हेमचंद्रानेच देशीनाममाला या आपल्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, 'जे लक्खणे ण सिद्धा ण पसिद्धा सक्कयाहिहाणेसु, ण य गउणलक्खणासत्तिसंभवा', असे देशी शब्द आहेत. देश्य शब्दांबद्दल मार्कंडेय सांगतो :लक्षणैरसिद्धं तत्तद्देशप्रसिद्धं... । यदाह भोजदेवः :देशे देशे नरेन्द्राणां जनानां च स्वके स्वके। भझ्या प्रवर्तते यस्मात् तस्माद्देश्यं निगद्यते।। याउलट सिद्ध आणि साध्यमान संस्कृत शब्द हेच प्राकृतचे मूळ आहेत; साहजिकच प्राकृतचे हे लक्षण देश्य शब्दांना लागूच पडत नाही. म्हणून सिद्ध व साध्यमान अशा विविध संस्कृत शब्दांवरून साधलेल्या प्राकृतचाच विचार हेमचंद्र या व्याकरणात करतो. सिद्ध-साध्यमान -- सिद्ध म्हणजे व्याकरणदृष्ट्या बनलेले शब्दाचे पूर्ण रूप. उदा. शिरोवेदना. शब्दाचे असे पूर्ण रूप बनण्यापूर्वीची जी स्थिति असते, ती साध्यमान अवस्था होय. उदा. शिरोवेदना असा संधी होण्यापूर्वी असणारी शिरस् + वेदना ही स्थिती. संस्कृतसम - संस्कृतमधील जे शब्द जसेच्या तसे प्राकृतात येतात, ते संस्कृत-सम शब्द. उदा. चित्त, वित्त इ. संस्कृतलक्षण - संस्कृत व्याकरण. प्रकृति: ....संज्ञादयः -- ‘प्रकृति' म्हणजे शब्दाचे मूळ रूप. उदा. देव, राम इ. प्रत्यय म्हणजे विशिष्ट हेतूने शब्दाच्या मूळ रूपापुढे ठेवले जाणारे वर्ण वा शब्द. उदा. सु, औ इ.