________________
टीपा
प्रथम पाद
१.१ अथ.. कारार्थश्च - संस्कृतमध्ये अथ या अव्ययाचे अनेक उपयोग
आहेत. या सूत्रात, नंतर (आनन्तर्य) आणि (नवीन विषयाचा) आरंभ (अधिकार) या दोन अर्थांनी अथ हा शब्द वापरलेला आहे. प्रकृति: संस्कृतम् - हेमचंद्राच्या मते, प्राकृत हा शब्द प्रकृति' या शब्दावरून साधलेला असून, प्रकृति (=मूळ) या शब्दाने संस्कृत ही भाषा अभिप्रेत आहे. म्हणजे प्राकृत भाषेचे मूळ संस्कृत आहे. तत्र भवं ... प्राकृतम् -- प्रकृति शब्दापासून प्राकृत शब्द कसा बनतो, ते येथे सांगितले आहे. 'तत्र भव:' (पा.अ.४.३.५३) किंवा 'तत आगतः' (पा.अ.४.३.७४) या सूत्रांनुसार प्रकृति शब्दाला तद्धित प्रत्यय लागून प्राकृत हा शब्द बनला आहे. प्रकृति असणाऱ्या संस्कृतपासून निर्माण झालेले वा प्रकृति असणाऱ्या संस्कृतमधून निघालेले, ते प्राकृत. प्राकृतम् -- प्रस्तुत व्याकरणात माहाराष्ट्री प्राकृत असा शब्द हेमचंद्राने वापरलेला नाही. तथापि प्राकृत या शब्दाने त्याला माहाराष्ट्री प्राकृत अभिप्रेत आहे. प्राकृतमंजरी, भूमिका, पृ.३ वर म्हटले आहे :तत्र तु प्राकृतं नाम महाराष्ट्रोद्भवं विदुः। माहाराष्ट्री प्राकृतबद्दल दंडी असे म्हणतो :महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः। संस्कृतानन्तरं...क्रियते - संस्कृतनंतर म्हणजे संस्कृत व्याकरणानंतर प्राकृत (व्याकरणा) चा आरंभ केला जात आहे. हेमचंद्रकृत सिद्धहेमशब्दानुशासन या व्याकरणाचे एकूण आठ अध्याय आहेत; पहिल्या सात अध्यायांत संस्कृतचे व्याकरण असून, प्रस्तुतच्या आठव्या अध्यायात, माहाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचे व्याकरण आहे. संस्कृतच्या व्याकरणानंतर प्राकृतव्याकरणाचा प्रारंभ असल्याने, संस्कृत व्याकरणाचे ज्ञान आहे, हे येथे गृहीत धरलेले आहे.