________________
(२६)
वा पद्ये पुनः पुढे आले आहेत, तेथे त्यांचे संस्कृत शब्द वा छाया बहुधा पुनः दिलेले नाहीत. प्राकृत अव्ययांचा उपयोग असणाऱ्या शब्दसमूहाचे वा पद्याचे बाबतीत, संस्कृत प्रतिशब्द वा छाया देताना, प्राकृत अव्ययेच कंसात ठेवली आहेत; क्वचित् त्यांचे समानार्थी संस्कृत शब्दही पुष्कळदा कंसात ठेवले आहेत. प्राकृत शब्दरूपांच्या विभागात, फक्त मूळ संस्कृत शब्दच तळटीपांत दिला आहे आणि तळटीपांतही आवश्यक तेथे मागील पुढील सूत्रांचे संदर्भ निर्दिष्ट केले आहेत. (ई) तांत्रिक शब्द इत्यादींचे स्पष्टीकरण व इतर आवश्यक वाटले ते स्पष्टीकरण शेवटी टीपांत दिले आहे. पद्यात्मक उदाहरणांची भाषांतरेही टीपांतच आलेली आहेत. टीपांमध्ये पुष्कळदा मराठी, हिंदी यातील सदृश उदाहरणे दिली आहेत. ज्यांवर एकदा टीपा देऊन झाल्या आहेत, त्यांवर प्रायः पुनः टीपा दिलेल्या नाहीत; पण काहीवेळा टीपांचे मागील पुढील संदर्भ निर्दिष्ट केले आहेत. रूपे इत्यादींच्या स्पष्टीकरणासाठी व इतर काही कारणांसाठी टीपांमध्ये अनेकदा मागील पुढील सूत्रांचे संदर्भही दिले आहेत. (उ) सूत्रांचे संदर्भ देताना, प्रथम पाद व मग सूत्रक्रमांक दिले आहेत. पद्यांचे संदर्भ देताना, प्रथम पाद, मग सूत्र आणि नंतर त्या सूत्राखालील पद्यक्रमांक निर्दिष्ट केला आहे.
प्राकृत शब्दांचे मूळ संस्कृत शब्द व प्राकृत पद्यांची संस्कृत छाया तळटीपांत आले असल्याने, प्राकृत शब्दांची स्वतंत्र सूची दिलेली नाही. फक्त सूत्रांची सूची दिलेली आहे. या पुस्तकात वापरलेल्या संक्षेपांचे स्पष्टीकरण स्वतंत्रपणे दिले आहे. आभार-प्रदर्शन
माझ्या सर्व लेखनाचे मागे प. पू. श्रीदासराममहाराज केळकर यांचे आशीर्वाद आहेत, तसेच माझे शिक्षक श्री.शं.गो. गोखले व प्रा.डॉ. माईणकर यांचे प्रोत्साहन आहे. माझ्या लेखनास सवड देणारे माझे कुटुंबीय- पत्नी सौ. माया, चिरंजीव प्रा. नारायण के. आपटे आणि स्नुषा सौ. पद्मावती या सर्वांना धन्यवाद.
प्रस्तुत ग्रंथाचे लेखन मी करावे अशी प्रा.डॉ.स.गं. मालशे व प्रा.सु.आ.गावस्कर यांची इच्छा होती. त्यांचे मला स्मरण होते. या प्राकृत