________________
(२५)
(आ) वृत्तीमध्ये सूत्रांचा अर्थ येत असल्याने, सूत्रांचे स्वतंत्र भाषांतर न देता, फक्त वृत्तीचे भाषांतर दिले आहे. मूळातील तांत्रिक शब्द भाषांतरात तसेच ठेवले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण शेवटी टीपांत दिले आहे. मूळात नसणारे पण अर्थ कळण्यास आवश्यक असणारे शब्द कंसात ठेवले आहेत. भाषांतरातच आवश्यक वाटला तेथे काही शब्दांचा खुलासा त्या शब्दापुढे कंसात बरोबर चिन्ह करून (=) दिला आहे. अनेकदा हेमचंद्र सूत्रांत दिलेले शब्द पुनः वृत्तीत देत नाही. असे शब्द भाषांतरात घेतले आहेत; कधी ते कंसात ठेवले आहेत. काही वेळा मूळाचे शब्दश: भाषांतर थोडे वेगळे होत असल्यास, ते कंसात 'श' शब्द वापरून (श) दिले आहे. वृत्तीतील अनेक उदाहृत शब्दांची भाषांतरात पुनरुक्ती टाळली आहे; फक्त त्यातील पहिला शब्द व मध्ये टिंबे घालून शेवटचा शब्द भाषांतरात दिला आहे.
फक्त
पद्यात्मक उदाहरणांचे बाबतीतही असाच संक्षेप साधला आहे. व्यंजने पायमोडकी (क् इत्यादी) न देता हेमचंद्र त्यात अ हा स्वर मिसळून देतो. भाषांतरातही बहुधा तसेच केले आहे. काही ठिकाणी मात्र भाषांतरात व्यंजने पायमोडकी दिलेली आहेत. वृत्तीतील उदाहरणात्मक शब्दांचे अर्थ प्रायः दिलेले नाहीत; पद्यात्मक उदाहरणांचे अर्थ शेवटी टीपांत दिलेले आहेत. अपभ्रंशाच्या चर्चेत जेव्हा काही मागील पद्ये पुन: पुढे आली आहेत त्यावेळी त्यांचे मागचे संदर्भ दिले आहेत; पुन: भाषांतर मात्र दिलेले नाही आणि भाषांतरात आवश्यक तेथे मागच्या पुढच्या सूत्रांचे संदर्भ दिलेले आहेत.
(इ) हेमचंद्र कधी मूळ संस्कृत शब्द सूत्रात देतो व त्यांचे प्राकृत वर्णान्तर सूत्रात वा वृत्तीत सांगतो; कधी त्याने वृत्तीत प्रथम संस्कृत शब्द देऊन मग त्यांचे प्राकृत वर्णान्तर दिले आहे; कधी वृत्तीत प्राकृत शब्द प्रथम देऊन मग तो त्यांची संस्कृत मूळे देतो; कधी तो काही प्राकृत शब्दांचेच संस्कृत प्रतिशब्द देतो; तर कधी तो संस्कृत प्रतिशब्द देतच नाही: पद्यांचीही संस्कृत छाया त्याने दिलेली नाही. तेव्हा जेथे हेमचंद्र मूळ संस्कृत शब्द वा छाया देत नाही, फक्त अशाच ठिकाणी संस्कृत शब्द वा छाया तळटीपांत दिले आहेत. प्राकृत वैकल्पिक शब्दांच्या बाबतीत एकदाच संस्कृत शब्द तळटीपात आहे. फार क्वचित् भाषांतरातच त्या प्राकृत शब्दानंतर संस्कृत प्रतिशब्द कंसात दिला आहे. जेव्हा मागील प्राकृत शब्द