________________
(२०)
माहाराष्ट्री
चंडाने आपल्या व्याकरणात माहाराष्ट्री हे नाव वापरलेले नाही. वररुचीने माहाराष्ट्री नाव वापरले आहे. माहाराष्ट्रीला प्राकृतचंद्रिका आर्ष हे नाव देते, तर हेमचंद्र इत्यादी ग्रंथकार प्राकृत शब्दाने माहाराष्ट्रीचा निर्देश करतात. दंडिन्च्या मते महाराष्ट्राश्रया प्राकृत प्रकृष्ट आहे. प्राकृत वैयाकरणांच्या मते, सर्व प्राकृतभाषांत माहाराष्ट्री हीच मुख्य व महत्त्वाची आहे; ती अन्य प्राकृतांना मूलभूत मानली२ गेली आहे किंवा इतर प्राकृतांच्या अभ्यासाला अति उपयुक्त मानली गेली आहे. त्यामुळे प्राकृत वैयाकरण प्रथम माहाराष्ट्रीचे स्वरूप संपूर्ण व सविस्तर सांगतात व मग तिच्यापेक्षा इतर प्राकृतांची जी भिन्न वैशिष्ट्ये आहेत तेवढीच ते सांगतात. हेमचंद्राने हीच पद्धत अवलंबिली आहे.
माहाराष्ट्री या नावावरून ही प्राकृत महाराष्ट्रात उत्पन्न झाली व तेथे ती प्रचारात होती असे अनेकजण मानतात. पण हे म्हणणे काही लोकांना मान्य नाही.
पुष्कळ काव्यग्रंथ माहाराष्ट्री प्राकृतात आहेत. सेतुबंध, गउडवह इत्यादी ग्रंथांत माहाराष्ट्री वापरलेली आहे. संस्कृत नाटकांत गद्यामध्ये शौरसेनी भाषा वापरणारी पात्रेही पद्यामध्ये माहाराष्ट्री वापरतात. प्राकृत व्याकरणांतूनही माहाराष्ट्रीची उदाहरणे सापडतात.
आर्ष (अर्धमागधी) प्राकृत
हेमचंद्राच्या आर्ष शब्दाने श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथांची अर्धमागधी भाषा सूचित होते. या भाषेला जैनग्रंथ ऋषिभाषिता असे म्हणतात; हिलाच अर्धमागध, अर्धमागधा अशीही नावे आहेत. ही अर्धमागधी संस्कृत नाटकांत आढळणाऱ्या अर्धमागधीपेक्षा भिन्न स्वरूपाची आहे; म्हणून हिला कधी कधी जैन अर्धमागधी असे म्हटले जाते.
जैन लोक अर्धमागधीला देवांची भाषा मानतात. महावीर याच भाषेत उपदेश करीत असत व धर्मोपदेश ऐकण्यास जमलेल्या सर्वांना समजेल अशा त्या त्या
१ महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः। दण्डिन् २ तत्र सर्व भाषोपयोगित्वात् प्रथमं माहाराष्ट्री भाषा अनुशिष्यते। मार्कण्डेय ३ संस्कृत नाटकांत नोकर, राजपुत्र व श्रेष्ठी यांची भाषा अर्धमागधी सांगितलेली आहे.