________________
(१९)
आठव्या अध्यायात सांगितलेले प्राकृत व्याकरण चार पादांत विभागलेले आहे. पहिल्या तीन पादांत हेमचंद्राने माहाराष्ट्रीचे स्वरूप सविस्तर सांगितले आहे. चौथ्या पादात इतर प्राकृतांचे विवरण हेमचंद्र करतो. अपभ्रंश प्राकृताला महत्त्वाचे स्थान देऊन, त्या भाषेचे विस्तृत व अनेक पद्यात्मक उदाहरणांनी नटलेले विवेचन करणारा हेमचंद्र हाच पहिला प्राकृत वैयाकरण आहे. हेमचंद्राने अपभ्रंशाचे उपप्रकार असे कोणतेच सांगितलेले नाहीत.
हेमचंद्राने वर्णिलेल्या प्राकृतांची संक्षिप्त माहिती
हेमचंद्राने प्राकृत, शौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची व अपभ्रंश या भाषांची चर्चा केली आहे व आर्ष प्राकृतला प्राकृतचे नियम विकल्पाने लागतात असे म्हटले आहे. हेमचंद्राचा प्राकृत हा शब्द सामान्य प्राकृतभाषावाचक शब्द नसून, तो त्याने माहाराष्ट्री प्राकृतसाठी वापरलेला आहे; कारण त्याने सांगितलेले प्राकृतचे स्वरूप माहाराष्ट्रीच्या स्वरूपाशी मिळते-जुळते आहे आणि या संदर्भात, 'तत्र तु प्राकृतं नाम महाराष्ट्रोद्भवं विदुः।' हे लक्ष्मीधराचे म्हणणे लक्षात घेण्यासारखे आहे. आर्ष प्राकृतमधली उदाहरणे हेमचंद्र अधून-मधून देतो. आर्ष प्राकृत या शब्दाने हेमचंद्राला श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथांची अर्धमागधी भाषा अभिप्रेत आहे, हे त्याच्या सूत्र ४.२८७ वरील वृत्तीवरून स्पष्ट होते. हेमचंद्राने वर्णिलेली चूलिका पैशाची ही स्वतंत्र, प्रधान प्राकृत भाषा नसून, पैशाची भाषेचीच एक उपभाषा दिसते. हेमचंद्राने इतरत्र जे म्हटले आहे ते याला पुष्टिदायक आहे. अभिधानचिन्तामणि या आपल्या ग्रंथात, भाषा: षट् संस्कृतादिकाः' या आपल्या वचनाचे स्पष्टीकरण करताना हेमचंद्र म्हणतो :- संस्कृत-प्राकृतमागधी-शौरसेनी-पैशाची-अपभ्रंश-लक्षणाः। येथे त्याने चूलिका पैशाचीचा स्वतंत्र भाषा म्हणून उल्लेख केलेला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तेव्हा चूलिकापैशाची ही पैशाचीचा उपभेद मानणे वावगे ठरणार नाही. तेव्हा माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची व अपभ्रंश या प्रधान प्राकृतांचे विवरण हेमचंद्राने केले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
सर्वासु भाषास्विह हेतुभूतां भाषां महाराष्ट्रभुवां पुरस्तात्। निरूपयिष्यामि यथोपदेशं श्रीरामशर्माहमिमां प्रयत्नात्।। रामशर्मतर्कवागीश