________________
(१८)
ग्रंथ रचले आणि वि.सं. १२२९ (ई.स. ११७२) मध्ये देहत्याग केला.
हेमचंद्राची विद्वत्ता पाहून, प्राचीन काळी त्याला 'कलिकालसर्वज्ञ' ही पदवी दिली गेली. काही आधुनिकांनी त्याला 'ज्ञानसागर' म्हटले आहे.
हेमचंद्राच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. त्यांतील काही त्याचे आहेत का अशी शंका घेतली जाते. तसेच, या ग्रंथातील काही सध्या अनुपलब्ध, काही अमुद्रित, तर काही मुद्रित आहेत. या ग्रंथांची नावे अशी :- सिद्धहेमशब्दानुशासन; अभिधानचिन्तामणि, अनेकार्थसंग्रह, देशीनाममाला, निघण्टुशेष, काव्यानुशासन, छन्दोऽनुशासन, द्व्याश्रयमहाकाव्य, प्रमाणमीमांसा, द्विजवदनचपेटा, योगशास्त्र (अध्यात्मोपनिषद्), त्रिषष्टिशलाकापुरुष - चरित्र; परिशिष्टपर्व, वीतरागस्तोत्राणि, महादेवस्तोत्र, अयोगव्यवच्छेदद्वात्रिंशिका, अन्ययोगव्यवच्छेदद्वात्रिंशिका, अर्हन्नीति, विभ्रमसूत्र, नाममालाशेष ( शेषनाममाला), न्यायबलाबलसूत्र, बालभाषाव्याकरणसूत्रवृत्ति, वेदाङ्कुश, शेषसंग्रह, शेषसंग्रहसारोद्धार, सप्तसंधानमहाकाव्य, चन्द्रलेखविजयप्रकरण, वादानुशासन, नाभेयनेमिद्विसंधानकाव्य, अलङ्कारवृत्तिविवेक, अर्हत्सहस्रनामसमुच्चय, अभिधानचिन्तामणि परिशिष्ट इत्यादी.
हेमचंद्राचे प्राकृत व्याकरण
सिद्धराजाच्या सूचनेवरून हेमचंद्राने सिद्धहेमशब्दानुशासन हे संस्कृत-प्राकृतव्याकरण रचले. या व्याकरणाचे एकूण आठ अध्याय आहेत. पहिल्या सात अध्यायांत संस्कृत व्याकरणाची चर्चा आहे, तर अंतिम आठव्या अध्यायात प्राकृत व्याकरण आहे. त्यामध्ये माहाराष्ट्री (प्राकृत), शौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची आणि अपभ्रंश या प्राकृतांची लक्षणे व उदाहरणे हेमचंद्राने दिली आहेत. व प्राकृतचे नियम विकल्पाने आर्ष (अर्धमागधी) प्राकृतला लागतात असे तो म्हणतो.१ हेमचंद्राचे हे प्राकृत व्याकरण विस्तृत असून प्रमाणभूत आहे. या प्राकृत व्याकरणातील नियमांची उदाहरणे हेमचंद्रकृत कुमारपालचरित या ग्रंथातही आढळून येतात.
१ यदपि 'पोराणमद्धमागहभासानिययं हवइ सुत्तं' इत्यादिना आर्षस्य अर्धमागधभाषानियतत्वमाम्नायिवृद्धैस्तदपि प्रायोऽस्यैव विधानान्न वक्ष्यमाणलक्षणस्य।