________________
(१७)
स्पष्टीकरण करणे हेमचंद्रालाच आवश्यक वाटले, म्हणून त्या ग्रंथांवर त्याने आपली स्वोपज्ञ वृत्ति रचली आहे.
गुजरातमधील धंधुका (धंधू, धुंधुका) या गावी विक्रम संवत् ११४५ (ई.स.१०८८) मध्ये हेमचंद्राचा जन्म मोढ-महाजन (वणिक्) जातीत झाला. त्याच्या कुटुंबाच्या धर्माविषयी निश्चित माहिती नाही; पण त्यावर जैनधर्माचा प्रभाव होता असे दिसते. हेमचंद्राचे जन्म नाव चंगदेव (चांगदेव, चांगोदेव) होते. त्याच्या पित्याचे नाव चच्च (चच्चिग, चाच, चाचिग) होते; व त्याच्या मातेचे नाव पाहिणी (पाहिनी, चाहिणी, चंगी) होते. एकदा देवचंद्रसूरि नावाचा जैनधर्मानुयायी धंधुका गावी आला. चांगदेवाची काही अंगचिन्हे पाहून, त्याला जैन साधु करण्याच्या इच्छेने, देवचंद्राने पाहिणीजवळ चांगदेवाची मागणी केली. त्यावेळी चांगदेवाचा पिता परगावी गेलेला होता. मातेने मोठ्या कष्टाने देवचंद्राची मागणी मान्य केली. ही गोष्ट कळल्यावर परत आलेल्या चच्चाला राग आला. पण सिद्धराजाच्या उदयन नावाच्या जैन मंत्र्याने त्याची समजूत काढली. ___ चांगदेवाला पाचव्या वर्षीच देवचंद्राने जैन साधूची दीक्षा दिली व त्याचे सोमचंद्र असे नाव ठेवले. सोमचंद्राने आवश्यक तो विद्याभ्यास केला. पुढे गिरनार पर्वतावर सोमचंद्राने सरस्वतीदेवीची उपासना केली. प्रसन्न होऊन सरस्वतीने त्याला सारस्वत मंत्र दिला; त्यामुळे सोमचंद्र विद्वान् झाला. त्याची विद्वत्ता पाहून, काही काळाने देवचंद्राने त्याला 'सूरि' ही पदवी दिली व त्याचे हेमचंद्र असे नवीन नाव ठेवले.
एकदा हेमचंद्राने गुजरातच्या राजधानीला भेट दिली. तेथे सिद्धराज नावाच्या तत्कालीन राजाशी त्याचा परिचय करून देण्यात आला व नंतर हेमचंद्र त्याच्याच आश्रयाने राहिला. या सिद्धराजाच्या सूचनेनुसार हेमचंद्राने सिद्धहेमशब्दानुशासन नावाचे व्याकरण रचले. सिद्धराजाच्या कुमारपाल या पुतण्यावर हेमचंद्राचा फारच प्रभाव पडला. कुमारपालाच्या कारकीर्दीतही हेमचंद्राने आणखी ग्रंथरचना केली.
चौऱ्यांशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य हेमचंद्राला लाभले होते. त्याने वादविवाद केले, अनेकांना जैनधर्माकडे वळविले, अनेक शिष्य केले, विविध