________________
(१५)
प्राकृतभाषांची नावे
ज्या जाति-जमाती विशिष्ट प्राकृत बोलत, त्यांवरून त्या प्राकृतांना नावे दिलेली दिसतात. उदा. शाबरी, चाण्डाली इत्यादी तसेच, ज्या प्रातांत ज्या प्राकृत बोलल्या जात, त्या प्रांत वा देश नावावरून त्या प्राकृतांना नावे दिलेली दिसतात. उदा. शौरसेनी, मागधी इत्यादी. या संदर्भात लक्ष्मीधराचे म्हणणे लक्षणीय आहे :
शूरसेनोद्भवा भाषा शौरसेनीति गीयते ।
मगधोत्पन्नभाषां तां मागधीं संप्रचक्षते ।
पिशाचदेशनियतं पैशाचीद्वितयं भवेत् ॥
माहाराष्ट्री हे नाव महाराष्ट्र यावरून पडले आहे. भिन्न भिन्न अपभ्रंशही त्या त्या देशात बोलल्या जात असत.
प्राकृतांचे सामान्य स्वरूप
प्राकृतभाषा आर्यभारतीय भाषासमूहात मोडतात, हे मागे सांगितले आहे. एके काळी जरी या प्राकृत बोलीभाषा होत्या तरी आज मात्र त्या बोली स्वरूपात नाहीत. त्यांचे अवशेष साहित्यात सापडतात. कांही प्राकृत भाषांचे बरेच वाङ्मय उपलब्ध आहे. संस्कृत भाषा आणि अर्वाचीन आर्य भारतीय भाषा यांच्यापेक्षा प्राकृतांचे स्वरूप काही बाबतीत भिन्न आहे. काही विद्वानांच्या मते, मुख्य प्राकृतांतून किंवा त्या प्राकृतांच्या अपभ्रंशांतून अर्वाचीन आर्य भारतीय भाषा उत्पन्न झाल्या. उदा. माहाराष्ट्री-अपभ्रंश-मराठी; मागधी- अपभ्रंश - बंगाली इत्यादी.
प्राकृतांतील शब्दसंग्रह
प्राकृत वैयाकरणांच्या मतानुसार, प्राकृतभाषा संस्कृतपासून साधलेल्या आहेत. या आपल्या मताला अनुसरून, प्राकृतमधील शब्दांचे त्रिविध वर्गीकरण त्यांनी दिलेले आहे :
( १ ) तत्सम (संस्कृतसम ) :- जे संस्कृत शब्द कोणताही फरक न होता प्राकृतात जसेच्या तसे येतात, ते तत्सम शब्द. उदा. इच्छा, उत्तम, बहु इत्यादी.