________________
प्रकरण १ : अर्धमागधी वर्णमाला
३७
१६ अर्धमागधीतील जोडाक्षरांविषयी अधिक विचार
(१) अर्धमागधीतील जोडाक्षरात फक्त दोनच व्यंजने असतात. संस्कृतप्रमाणे दोनापेक्षा अधिक व्यंजनांची जोडाक्षरे अर्धमागधीत नाहीत. (२) अर्धमागधीत शब्दांच्या आद्य' स्थानी जोडाक्षर चालत नाही. (पदादौ द्वित्वं न भवति । चंड. ३.२८). तसेच शब्दांच्या अंतीही (जसे केवळ व्यंजन चालत नाही तसे) स्वररहित संयुक्तव्यंजन चालत नाही. शब्दांच्या मध्यस्थानी तेवढे जोडाक्षर चालते. (३) अर्धमागधीत अनुस्वारापुढे संयुक्त व्यंजन चालत नाही (न दीर्घानुस्वारात् । हेम. २.९२). त्यामुळे विन्ध्य, सन्ध्या इत्यादींचे वर्णविकार झाल्यावर फक्त विंझ, संज्ञा असे शब्द चालतात.
१. “ख घ थ ध फ भ ही सर्व प्राकृतात क् + ह, ग् + ह, त् + ह, द् + ह, प् + ह, ब् + ह याप्रमाणे (हकाराची) संयुक्त व्यंजनेच मानली जातात.” (वैद्य, पृ. १६). तद्वत् ण्ह (न्ह), म्ह, ल्ह हीहि ण् (न्), म्, ल यांची हकारयुक्त संयुक्त व्यंजनेच आहेत (साहजिकच त्यांच्यामागे असणारा दीर्घ स्वर ह्रस्व झालेला आढळतो. उदा. आह्लाद - अल्हाय, ग्रीष्म - गिम्ह इ.). तथापि ती अर्धमागधीत शब्दारंभी चालतात. उदा. ण्हाउ (स्नायु), म्हो (स्मः), ल्हसुण (लशुन) तसेच क्वचित् 'ह' हेहि शब्दारंभी अर्धमागधीत चालते. (परि. १०४ व तळटीप पहा); असे दिसते.