________________
30
अर्धमागधी व्याकरण
होतात. या अक्षरांचाही घटक' वर्ण आहे. वर्ण दोन प्रकारचे आहे. १) स्वर : ज्यांचा पूर्ण उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णाचे साहाय्य लागत नाही, त्यांना स्वर म्हणतात. म्हणजेच स्वरांचा उच्चार स्वयंपूर्ण असतो. २) व्यंजन : ज्यांचा पूर्ण उच्चार होण्यास स्वरांची आवश्यकता असते, त्यांना व्यंजन म्हणतात. हे वर्ण कोणते व किती, त्यांचा उच्चार कसा करावयाचा, इत्यादीचा विचार पहिल्या भागात येईल. तसेच कित्येकदा जवळ असणाऱ्या वा आलेल्या वर्णांचा काही विशिष्ट परिस्थितीत संयोग होतो, त्याला संधि म्हणतात. या संधिचाही विचार पहिल्या भागात येईल. आता, अर्धमागधीतील वर्ण वा शब्द संस्कृतमधून येताना कोणते विकार पावून येतात. हे पाहणेही महत्त्वाचे आहे. या वर्णविकारांचा विचारही पहिल्या भागात करावयाचा आहे. २) शब्दांचा वाक्यात उपयोग होत असता काही शब्दात विकार व्हावे लागतात. या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. हे विकारी शब्द म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे होत या विकारी शब्दांची रूपे कशी व कोणती होतात, हा भाग ‘रूपविचार' या दुसऱ्या विभागात येईल. ३) भाषेचा शब्दसंग्रह इतर शब्दांवरून आणखी काही शब्द साधून वाढविला जातो. हे साधित शब्द कसे साधिले जातात. हा विचार 'साधितशब्दसिध्दी' या तिसऱ्या विभागात येईल. ४) संस्कृत व प्राकृत भाषांच्या व्याकरणात समासांचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे. हा 'समासविचार' चौथ्या विभागात केला आहे. ५) पूर्ण अर्थबोध होण्यास वाक्यांची जरूरी असते, असे वर म्हटले आहे. वाक्यातून पूर्ण अर्थबोध होण्यास वाक्यात वापरलेल्या शब्दांचा योग्य तो परस्पर संबंध राखणे आवश्यक असते. तसेच
१ वास्तविक शब्द हे ध्वनिरूप आहेत. म्हणून त्यांचे स्वरूप श्रवणग्राह्य आहे.
तथापि, डोळ्यांना दिसणाऱ्या काहीतरी खुणांनी लेखनात त्याचे रूप दाखविले जाते. लेखनातील या ध्वनींच्या खुणा किंवा चिह्न म्हणजेच वर्ण होत. केवल व्यंजनाचा उच्चार पूर्ण नसल्याने केवळ व्यंजने लेखनात दर्शविताना त्यांच्याखाली एक - असा तिरका फाटा काढतात (त्याचे पाय मोडतात) उदा. क्, ख् इ. व्यंजनात स्वर मिसळला की हा तिरका फाटा काढून टाकतात. उदा. क्+अ=क, ग्+ई=गी इ.