________________
१६
तत्त्वार्थसार
इंद्रियाच्या सहायाने होते, इंद्रियाचे विषय जे पदार्थाचे स्पर्श-रस-गंध वर्णरूप स्थूल विषय त्यालाच जाणते म्हणून या ज्ञानाला परोक्ष म्हटले. स्वसंवेदन ज्ञानाला अंतरंग प्रत्यक्ष व या इंद्रियप्रत्यक्ष ज्ञानाला व्यवहार प्रत्यक्ष-बाह्यप्रत्यक्ष म्हटले आहे. या इंद्रियप्रत्यक्ष ज्ञानाने पदार्थाच्या स्पर्शादि विषयाचे कथंचित् स्पष्ट ज्ञान होते म्हणून शास्त्रामध्ये या स्वसंवेदन प्रत्यक्ष व इंद्रियप्रत्यक्ष ज्ञानाला 'अनुभव' असे म्हटले आहे.
३) स्मृति- (अनुभूतस्मरणं स्मृतिः) स्वसंवेदन प्रत्यक्षपूर्वक इंद्रियप्रत्यक्षाने जाणलेल्या पदार्थाचे कालांतराने स्मरण होणे यांस स्मृतिज्ञान म्हणतात.
४) प्रत्यभिज्ञान- (अनुभव-स्मृतिहेतुकं संकलनात्मकं ज्ञानं प्रत्यभिज्ञानं) पूर्व अनुभव (इंद्रियप्रत्यक्ष) व स्मृति रूप परोक्ष ज्ञान यांचा परस्पर सदृश-विसदृश एक-अनेक इ. रूप संकलनात्मक जोडरूप संबंध दाखविणाऱ्या ज्ञानाला प्रत्यभिज्ञान म्हणतात. जसे- हा तोच आहे तसाच आहे. हा तो नाही-तसा नाही. हा लहान आहे, हा मोठा आहे.
५) तर्क- (व्याप्तिज्ञानं ऊहः) कार्य-कारण किंवा व्याप्य-व्यापक यामध्ये असणाऱ्या अविनाभाव संबंधाला व्याप्ति म्हणतात. व्याप्तिज्ञानाला तर्क किंवा ऊहज्ञान म्हणतात. कारण हे आपल्या सर्व कार्यामध्ये व्यापक असते. कार्य व्याप्य असते. कारणाच्या व्यापकाच्या सद्भावात कार्याचा व्याप्याचा सदभाव असणे ही अन्वयव्याप्ति, कारणाच्या अभावात कार्याचा अभाव असणे ही व्यतिरेक व्याप्ति, व्याप्तीला अविनाभाव असे म्हणतात. ( संकलोपसंहारवती व्याप्तिः ) अनेक अनुभव-स्मरण प्रत्यभिज्ञानपूर्वक कारण-कार्याच्या अविनाभाव-संबंधाचे ज्ञान यास तर्कज्ञान म्हणतात.
६) अनुमान- (लिंगात् लिगिविज्ञानं अनुमानं) तर्कज्ञान पूर्वक(कारण किंवा कार्यरूप) लिंगावरुन लिंगीचे (कारण किंवा कार्यरूपसाध्याचे) ज्ञान ते अनुमान ज्ञान होय. जसे कार्यरूप धूम लिंगावरुन कारणरूपलिंगीचे अग्नीचे ज्ञान होणे ते अनुमान ज्ञान होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org