________________
तत्वार्थसार
सम्यग्ज्ञानाचे स्वरूप व भेद सम्यग्ज्ञानं पुनः स्वार्थव्यवसायात्मकं विदुः ।
मतिश्रुतावधिज्ञानं मनःपर्ययकेवलं ॥१८॥ - अर्थ- ' स्वापूर्वार्थव्यवसायात्मकं ज्ञानं प्रमाणं ' न्यायशास्त्रामध्ये प्रमाणाचे लक्षण सांगताना सम्यग्ज्ञानाला प्रमाण म्हटले आहे.ते ज्ञान प्रथम स्वव्यवसायात्मक असते. अर्थात् ज्ञानाला 'अहं जानामि' रूप स्वव्यवसाय (दर्शन) प्रथम होतो. त्यालाच दर्शन म्हणतात. दर्शनपूर्वक स्वव्यवसायपूर्वक अर्थव्यवसाय होतो त्यास ज्ञान म्हणतात. दर्शन (स्वव्यवसाय) झाल्याशिवाय ज्ञान ( अर्थव्यवसाय ) होत नाही. अस्वसंवेदनज्ञानवादी ( स्वात्मनि क्रियाविरोधात् ) आपली क्रिया आपणावर होत नाही या न्यायाने ज्ञान स्वतःला जाणत नाही असे मानतात. त्या मताचे खंडन करण्यासाठी ज्ञानाचे लक्षण स्वव्यवसाय मानले आहे. जे ज्ञान स्वला जाणत नाही ते ज्ञान पराला देखील जाणू शकत नाही. प्रत्येक पदार्थाला जाणताना प्रथम स्वव्यवसाय होतो. प्रथम दर्शन होते नंतर अर्थव्यवसायरूप ज्ञान होते. जे विज्ञानाद्वैतवादी जगामध्ये केवळ एक ज्ञानपदार्थच मानतात, ज्ञानाला सोडून दुसरा ज्ञेय पदार्थ वेगळा नाही असे मानतात त्यांचे खंडन करण्यासाठी अर्थव्यवसाय हे ज्ञानाचे लक्षण सांगितले. जगात ज्ञेय पदार्थ जीव-अजीव (पुद्गल-धर्म-अधर्म-आकाश-काल) हे अन्य पदार्थ सत्रूप आहेत. म्हणून अर्थव्यवसायाला ज्ञान म्हटले. जे ज्ञानाला निर्विकल्प-व्यवसायात्मक निश्चयात्मक मानत नाहीत अशा मीमांसकमताचे खंडन करण्यासाठी ज्ञानाचे लक्षण व्यवसायात्मक निश्चयात्मक मानले आहे. याप्रमाणे जे स्व व पररूप ज्ञेय पदार्थ यांचे व्यवसायात्मक निश्चयात्मक यथार्थ समीचीन ज्ञान त्याला प्रमाणज्ञान म्हणतात. प्रमाणज्ञानाचे ५ भेद आहेत. १ मतिज्ञान, २ श्रुतज्ञान, ३ अवधिज्ञान, ४ मनःपर्ययज्ञान, ५ केवलज्ञान.
टीप- १ को वा तत्प्रतिभासिनं अर्थ अध्यस्तं इच्छन् तदेव तथा न इच्छेत?
___ (परीक्षामुख) २ स्वावभासनाशक्तस्य परावभासकत्वायोगात् । (परीक्षामुख)
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org