________________
मुखपृष्ठ परिचय
प्रकृतीची प्रसिद्ध पाच मूळ तत्त्वे आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. भारतातील प्रत्येक दर्शन किंवा धर्म यांपैकी एका तत्त्वाला मध्यवर्ती ठेवून विकसित झाले आहेत. जैनधर्माचे मध्यवर्ती तत्त्व अग्नी आहे. अग्नीतत्त्व ऊर्ध्वगामी, विशोधक, लघु आणि प्रकाशक आहे.
श्रुतज्ञान अग्नीप्रमाणे अज्ञानाचे विशोधक आणि प्रकाशक आहे. अग्नीच्या या दोन गुणधर्मांना मध्यवर्ती ठेवून मुखपृष्ठाची पृष्ठभूमी (Theme) तयार केली आहे.
काळा रंग अज्ञान व अशुद्धीचे प्रतीक आहे. अग्नीचे तेज अशुद्धींचे भस्म करत शुद्ध ज्ञानाकडे अग्रेसर करते. विशुद्धीची ही प्रक्रिया श्रुतभवनची मध्यवर्ती संकल्पना (Core Value) आहे.
अग्नी प्राण आहे. अग्नी जीवनाचे प्रतीक आहे. जीवनाची उत्पत्ती व निर्वाह अग्नीमुळे होतात. श्रुताच्या तेजामुळेच ज्ञानरूपी कमळ सर्वदा विकसित राहते आणि विश्वाला सौंदर्य, शांती व सुगंध देते. चित्रामध्ये पांढऱ्या रंगाचे कमळ याचे प्रतीक आहे.
श्रुतभवनामध्ये अप्रकट, अशुद्ध आणि अस्पष्ट शास्त्रांचे शुद्धीकरण होते. शुद्धीकरणाच्या फलस्वरूप श्रुततेजाच्या प्रकाशामध्ये ज्ञानरूपी कमळाचा उदय होतो.