________________
.६.
देशासाठी मी काय करू शकते / शकतो ?
(पुणे विद्यापीठातील जैन अध्यासन आणि सन्मति - तीर्थ, जैनविद्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फिरोदिया सभागृहात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. २६ जानेवारी २०१३, शनिवार - या दिवशी राष्ट्रभक्तिपर गीते आणि राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनानंतर सर्व उपस्थित श्रोतृवर्गाला देशप्रेमविषयक छोटे-छोटे . उपाय सुचविण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व स्त्री-पुरुषांनी आपापले विचार अगदी संक्षेपात प्रस्तुत केले. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोनच दिवसांपुरते राष्ट्रप्रेमाचे भरते येण्यापेक्षा दैनंदिन जीवनात, आपण काय करू शकतो ? ते प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थित मांडले. त्यांचा गोषवारा १५ ऑगस्टच्या निमित्ताने देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !)
* टॅक्स भरताना, त्या पैशाचा उपयोग किती प्रमाणात होतो किंवा नाही याचा विचार न करता, प्रामाणिकपणे मी जास्तीत जास्त टॅक्स भरेन.
* माझ्या संपर्कात येणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाचे महत्त्व समजावून देऊन, त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करेन. त्यासाठी यथायोग्य सहाय्य तसेच मार्गदर्शनही करेन.
* मी ज्या ज्या भूमिकेतून व ज्या ज्या अवस्थेतून जाते, तेव्हा तेव्हा माझ्या कर्तव्यांचे मी दक्षतेने पालन करेन. कर्तव्यपराङ्मुख होणार नाही.
* मी देशसेवेची सुरवात, नागरिकशास्त्रापासून करेन. घर तर आपण स्वच्छ ठेवतोच पण आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. ज्या कारणाने पर्यावरण बिघडेल, अशी एकही वस्तू बाहेर टाकणार नाही. * बँकिंग, इन्शुअरन्स इ. सेवाक्षेत्रातच मी काम करत असल्यामुळे, देशसेवा करण्यासाठी इतरत्र न जाता, मी लोकांना जी सेवा देतो, तीच न कटाळता व आनंदाने देईन.
* गरजवंतांना अल्पशी का होईना आर्थिक मदत करेन.
* भ्रष्टाचार न होण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. पहिली गोष्ट भ्रष्टाचारातून येणारा पैसा आपल्या घरात येऊ देणार नाही. दुसरी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीत, जसे ड्रायव्हिंग टेस्ट न देता म्प्रसन्स मिळविणे, रांगेत उभे न राहता तिकिटे मिळविणे इ. इ. गोष्टी स्वतःच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन.
* गाडीवरून जाताना सिग्नल यंत्रणेच्या व्यवस्थेचे पालन करेन. वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन.
* अंघोळीच्या निमित्ताने पाण्याचा होणारा अतिवापर व अपव्यय टाळण्याचा मी प्रयत्न करेन. गळणारे नळ दुरुस्त करेन.
ताबडतो
* सोलर एनर्जीचा वापर करून, विजेची बचत तसेच मर्यादित वापर करेन.
* दूषित व भ्रष्ट राजकारण व नेते यांच्या विरोधात नुसती चर्चा करणे आणि मतदानाला न जाणे असे दुहेरी वर्तन करणार नाही. प्रामाणिकपणे मतदान करेन. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरातसुद्धा फक्त ५० % आसपास मतदान होणे ही आपणा सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
* आठवड्यातून एक दिवस तरी वाहन न वापरण्याचा प्रयत्न करेन.
* जवळच्या अंतरासाठी पायी चालत जाण्याचा प्रयत्न करेन.
* आपल्या बोलण्याचा व वागण्याचा त्रास दुसऱ्याला होणार नाही याची दक्षता घेईन.
* आपल्या भावी युवा पिढीला औपचारिक शिक्षणाबरोबर, नैतिकमूल्यांचा परिचय करून देईन. नीतिमूल्यांचे विचारधन त्यांना देऊन त्यांच्यामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करेन.
* राष्ट्रीय संपत्तीचे जतन करेन. अन्नधान्याचा वापर काळजीपूर्वक करेन. स्वयंपाक करून शिजवलेले अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेईन. अन्नधान्याचा साठा खराब न होण्याची खबरदारी घेईन.