________________
थोडक्यात चातुर्मास, त्यातही पर्युषण महापर्व, हे इतर समाजाकरिताही, जैन धर्माचे हृदय जाणून घेण्याचा काळ आहे. जैनांकरिता त्यांच्या तपोमय, त्यागमय, संयमी वृत्तीमुळे हा महोत्सव आगळा वेगळा ठरतो. त्यांच्या दृष्टीने धर्मभावनेची बॅटरी पुन्हा चार्ज होते. सामूहिक भावना पुन्हा वाढीला लागते. हेवेदावे विसरण्याचा प्रयत्न होतो व सर्व समाज शांतपणे पुन्हा उर्वरित आठ महिने आपल्या व्यापात मग्न होण्याकरिता तयार होतो.
जाता जाता एकच सुचवावेसे वाटते की जेव्हा या निमित्ताने सर्व समाज इतक्या मोठ्या संख्येने गोळा होतो, तेव्हा पूर्ण समाजाच्या दृष्टीने विचारमंथन व्हावयास हवे. जैन समाजास एक निश्चित दिशा मिळावयास हवी व संघटनात्मक कौशल्याचा देशकार्यासाठी कसा उपयोग होऊ शकेल हेही पहावयास हवे. तसे झाले तर चातुर्मासचा उद्देश पूर्णत: साध्य झाल्याचे समाधान मिळेल.
**********