________________
जैनांचे पर्युषण महापर्व : एक सकारात्मक बाजू
सुमतिलाल भंडारी (पर्युषण-पर्व संपले की जैन पत्र-पत्रिकांमधे चर्चेला उधाण येते. त्यातील खर्च, भव्य मंडप, देखावा, भाषणबाजी, राजकीय नेत्यांची उपस्थिती, ठराविक मंडळींचा उदोउदो, पार्किंगच्या समस्या, आलोयणेच्या दिवशी होणारा कंटाळवाणा उशीर, पर्युषण संपल्यावर ओस पडणारी धर्मस्थाने - एक ना अनेक नकारात्मक मुद्दे पुढे येऊ लागतात. प्रस्तुत लेखात पर्युषण-पर्वाची जमेची बाजू मांडण्याचा प्रयत्न सन्मति-तीर्थच्या सजग विद्यार्थ्यांनी केला. त्यातील प्रमुख मुद्दे येथे दिले आहेत.)
वर्षाकाळाचे चार महिने जैन साधु-साध्वी, इतरत्र विहार न करता, एका ठिकाणी वास्तव्य करतात. या काळाला 'चातुर्मास' असे म्हणतात. साधु-साध्वींच्या सान्निध्याने त्या परिसरातला जैन समाज एकत्र येतो. त्यांच्या प्रवचनाला, इतर धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतो. दान, शील, तप याला वाहून घेतो. हे जैनांचेआगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ही परंपरा नित्यनियमाने हजारो वर्षांपासून चालू आहे. गाजावाजा न करता अथवा आमंत्रणाचे सोपस्कार न करताही अविरतपणे टिकून राहिली आहे.
चातर्मासाच्या या काळातील विशिष्ट आठ दिवस हे 'पर्यषण महापर्व' म्हणन ओळखले जातात. या आठ दिवसात संपूर्ण जैन समाजाचा कल धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याकडे असतो. सर्व समाज धर्मस्थानात एकत्र येतो. सकाळपासुन ते रात्रीपर्यंत धार्मिक कार्यात तो सहभागी होतो. या काळात जास्तीत-जास्त तप, दानधर्म, प्रभावना होते. एखाद्या महोत्सवाचे स्वरूप या काळाला प्राप्त होते. या आठ दिवसांची सांगता शेवटच्या दिवशी होते. त्या शेवटच्या दिवसाला 'संवत्सरी' असे म्हणतात.
पर्युषण महापर्वाची वैशिष्ट्ये : १) उद्योगधंद्याच्या निमित्ताने सतत व्यस्त असलेला जैन समाज, साधु-साध्वींच्या सान्निध्यात, जातपात, गरीबश्रीमंत, लहान-वृद्ध हे भेद विसरून एकत्र येतो. एकोप्याने राहतो. धार्मिक प्रवृत्तीकडे वळतो. याकरिता कोणालाही वेगळी सूचना द्यावी लागत नाही. २) धर्मस्थानात सर्वांची गाठभेट होते. एकापासून दुसऱ्याला प्रेरणा मिळते. लहान मंडळी मोठ्यांकडे पाहून त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे लहानांवर चांगले संस्कार होतात. यामुळे पवित्र वातावरण निर्मिती हे या काळाचे वैशिष्ट्य ठरते. ३) जैन धर्माला राजाश्रय नाही. बाह्य स्वरूपाचे अथवा औपचारिक शिक्षण नाही अथवा लोकसंख्येचा दबावही नाही. तरीही जैन धर्म हजारो वर्षांपासून टिकून राहिला आहे. एकसंघ राहिला आहे. कुटुंबाच्या व चातुर्मासाच्यामाध्यमातून धर्मभावना प्रबळ होत असल्याने, तो शिथिलाचरणापासून दूर राहिला आहे. ४) पर्यषणाच्या काळात पाऊस जास्त असल्याने या आठ दिवसात हिरवी पालेभाजी खाल्ली जात नाही. रात्रिभोजन केले जात नाही. (यालाही शास्त्रीय कारण आहे. पावसामुळे भाज्यांमध्ये सूक्ष्म जीवाणू निर्माण होतात. तसेच राया वेळी पतंगासारखे किडे ताटात पडतात. सूर्यप्रकाशात या किड्यांची निर्मिती होत नसल्याने, बरेच जैन लोक चार महिने फक्त दिवसा उजेडीच जेवतात.) ५) पर्युषणकाळात सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वजण धर्मकार्यात मग्न असतात. सकाळी प्रार्थना, नंतर प्रवचन, भोजनोत्तर सूत्रवाचन व सायंकाळी प्रतिक्रमण. सतत व्यस्त राहिल्याने सर्वांकडून यथाशक्ती अणुव्रतांचे पालन आपोआप होते. जास्तीचे खाणे, बाहेरचे खाणे (हॉटेलिंग), खरेदी, मनोरंजन (सिनेमा इ.) या सर्वांवर मर्यादा येते. ६) या काळात तप (उपवास, आयंबिल इ.) करण्याकडे सहज प्रवृत्ती होते. ही तप करण्याची भावना धार्मिक