________________
* अनेकान्तवादी असलेल्या जैन धर्मामध्ये श्वेतांबर-दिगंबर-मंदिरमार्गी-स्थानकवासी-तेरापंथी-सोलहपंथीसाडेतेरापंथी-गण-गच्छ विभागणी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या सर्वांना स्वातंत्र्याच्या एका ध्येयाखाली आणून श्रावकच नव्हे तर साधुवर्गातही नवचैतन्य निर्माण केले. अनेक जैन बुजुर्ग खादीचे व्रत घेऊन देशसेवा करू लागले.
हे सर्व जैनांना का जवळचे वाटले ? जैन लगेचच का आकृष्ट झाले ? कारण ही सर्व आपलीच तत्त्वे आहेत, हे पाहून जैन समाज खडबडून जागा झाला. सैद्धांतिक आधार असलेल्या तत्त्वांची प्रयोगशीलता जैन समाज विसरला होता. इतर कोणत्याही समाजापेक्षा जैन समाज गांधीजींकडे लगेच आकृष्ट झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवक्त ते प्रत्यक्ष आणि सक्रिय ओढले गेले.
ही सर्व तत्त्वे जरी 'जैन' होती तरी ती 'मृत' झाली होती. पण त्यांना 'जिवंत' करण्याचे काम गांधीजींनी केले गांधीजींनी ही तत्त्वे सक्षमपणे वापरून त्याचा प्रसार केला.
उपसंहार करताना असेच म्हणावेसे वाटते की पाऊस पडतो तेव्हा क्षेत्रमर्यादा नसते. चंद्र-सूर्य प्रकाश टाकतात तेव्हाही ते क्षेत्रमर्यादा आणि व्यक्तिभेद करीत नाहीत. या न्यायाने गांधीजींचे हे योगदान फक्त जैनांनाच नसून संपूर्ण भारतीय समाजालाच दिलेले आहे. इ) २० ते २५ वयोगटातील जैन युवक-युवतींच्या भावना
२० ते २५ वयोगटातील जैन युवक-युवतींच्या मनात काय चालले आहे ? यासाठी डेक्कन जिमखान्यावरील जैन होस्टेलमध्ये ग्रुप डिस्कशन ठेवले होते. त्यात जैन युवावर्ग म्हणतो की - ____ * हे सोडा, ते सोडा अशी नकारात्मकता कमी करा.
* खाण्यापिण्याच्या चर्चेभोवती आपला जो धर्म फिरतो आहे त्याचे स्वरूप बदला. 'शाकाहारा'च्या अंतर्गत चिकित्सेत शिरू नका.
* अहिंसेमुळे आलेली नकारात्मकता घालवून जैनांनी सकारात्मकता वाढवावी.
* आम्हाला मोक्ष आवडत नाही. आध्यात्मिकता नको, तर नैतिक गुणांचा परिपोष हवा आहे ; उपयुक्त आहे.
* महामस्तकाभिषेक, थाटामाटाचे पर्युषण-उत्सव, मंदिर-स्थानकनिर्माण इत्यादींकडील प्रचंड पैसा वळवून तो शिक्षण संस्था, ग्रंथालय उभारणीत लावू या.
* जैनविद्येत लपलेले विज्ञान तज्ज्ञमित्रांच्या सहाय्याने जगासमोर आणू या.
* पर्यावरणसंबंधी असलेले जैन विचार प्रत्यक्षपणे अगोदर जैनांमध्येच रूजवू या. जसे ओल्या कचऱ्यापासून फुलबाग-फळबाग फुलवू, सौरऊर्जेचा नैसर्गिक वापर करू. पाणी अडवू या पाणी जिरवू या.
* पक्षीमित्र-प्राणिमित्र बनू या. गांधीजींची सगळी तत्त्वे आत्ताच्या काळात चालणार नाहीत. मैत्रीभावासंबंधीचा जैनधर्मातील श्लोक आपण सार्थ करू या. तो श्लोक असा -
"खामेमि सव्वे जीवा, सव्वे जीवा खमंतु मे ।
मित्ती मे सव्वभूएसु, वेर मज्झ न केणई ।।' अर्थात् -
सर्व जीवांना मी क्षमा करतो.
सर्व जीव मला क्षमा करोत. माझी सर्व भूतमात्रांशी मैत्री असावी.
माझे कोणाशीही वैर नसावे. ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।