________________
१२ अपप्रवृत्तींचे स्वरूप उभे केले आहे. त्यात आत्महत्या, कौटुंबिक हिंसा, बुवाबाजी, काळी जाद, सामाजिक गुन्हे, आर्थिक घोटाळे, वैयक्तिक-धार्मिक-राजकीय इच्छा-आकांक्षासाठी केलेल्या हिंसा, यांचे वर्णन येते. हे वर्णन 'सत्यमेव जयते'च्या १३ एपिसोडची आठवण करून देते. दूरदर्शनवर क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया, दस्तक, लक्ष्य यात जे गुन्हेगारी जगताचे चित्रण दाखवितात तसाच प्रकाशझोत भगवान महावीरांनी समाजाच्या सर्व स्तरावर टाकला आहे.
(क) अहिंसेचे उपनिषद : भगवती आराधना
भगवती आराधना या ग्रंथात ‘अहिंसामाहात्म्य' या विषयाला वाहिलेल्या जवळजवळ १०० गाथा आहेत. 'गाथा' म्हणजे प्राचीन बोलीभाषेतील गेय रचना. ‘ते गीत चाल लावून म्हणणे' यास गाथा म्हणतात. संस्कृतमध्ये यास 'आर्या' किंवा 'श्लोक' म्हणतात. जणूकाही अहिंसेचे उपनिषद् असलेल्या या ग्रंथातील काही खास विचार पाहू
(१) त्रैलोक्य आणि तुझा जीव यातील एकाची निवड करायला सांगितली तर स्वाभाविकपणे प्रत्येकजण स्वजीवनच निवडेल. याचाच अर्थ असा की, कोण्या एका प्राणिमात्राचे जीवन हे त्रैलोक्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. म्हणून इतर कोणत्याही एका जीवाचा घात करणे म्हणजे त्रैलोक्याचाच घात करणे होय.
(२) खऱ्या अर्थाने 'अहिंसा' हे एकच व्रत आहे. बाकीची चार महाव्रते किंवा श्रावकांची अकरा अणुव्रते, ही फक्त अहिंसापालनासाठीच अंतिमत: उपयुक्त आहेत. हे उपमांद्वारे समजावताना आचार्य म्हणतात, जणू अहिंसा हे मुख्य पीक आहे आणि बाकीची व्रते ही त्या पिकाच्या रक्षणासाठी घातलेले कुंपण आहे.
(३) 'अणुपेक्षा लहान' आणि 'आकाशापेक्षा मोठी' अशी अहिंसा आहे. या गाथेवरून तुकारामांची गाथा आठवते – 'अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा'.
परब्रह्माचे वर्णन करताना उपनिषद्कार म्हणतात, 'अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमं'. हे जैनांच्या विचारसरणीशी अतिशय मिळतेजुळते आहे.
(४) मनुष्यांसाठी वयानुसार आखलेल्या, कर्तव्यकर्म जीवनपद्धतीवर आधारित अशा ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चारही आश्रमांचे अहिंसा हे 'हृदय' आहे. सर्व शास्त्रांचा 'गर्भ' आहे. सर्व गुणांचे 'सार' आहे. अहिंसा ही सर्व आश्रमांमध्ये सर्वात महत्त्वाचे आचारपालन किंवा कर्तव्यपालन आहे.
(५) मनुस्मृतिमध्ये जर 'गो-ब्राह्मण आणि स्त्री' यांची हत्या टाळणे हा जर धर्म असेल तर 'सर्वभूतदया' हाच खरोखर परमधर्म आहे.
(६) या संसारात आत्म्याची अनंत परिभ्रमणे चालू आहेत. प्रत्येक जीवाबरोबर त्याचा संपर्क एकदा किंवा अनेकदा आलेला आहे. वेगवेगळ्या नात्यांनी अलगअलग जन्मांमध्ये प्रत्येक जीव बांधला गेला आहे. यानुसार कोणत्याही जीवाची केलेली हिंसा म्हणजे आप्तस्वकीयांचीच हिंसा होते.
(७) जीववध हा आत्मवध आहे. जीवदया ही स्वत:वरचीच दया आहे. म्हणून जीववध हा विषकंटकाप्रमाणे टाळावा.
(८) स्वत:वर दबाव आणणे, त्याग करणे, पति ‘परमेश्वर' मानून सेवा करणे, संसारात एकरूप होऊन स्वत:वर अन्याय करणे, दुःख-क्लेशात बुडणे, आत्महत्या करणे, स्वत: प्रसन्न न राहणे, ही आत्महिंसेची उदाहरणे म्हणून सांगितली आहेत. आताचा जो परवलीचा शब्द आहे - 'प्रत्येकाला आपापली space द्या', 'मला space हवी', ती दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील पाणितलभोजी शिवार्यांनी अहिंसेच्या परिभाषेत याspace चे महत्त्व अधोरेखित केले आहे.
(९) 'हत' म्हणजे मार खाऊन घेणारा आणि 'घातक' म्हणजे मारणारा, घात करणारा - या दोहोंच्या मरणात फक्त काळाचेच तेवढे अंतर आहे. मी अमक्याला आत्ता मारीन, असे म्हणणारा काय अमरपट्टा घेऊन आला आहे