________________
ब) जैनवर्णित हिंसा-अहिंसा : प्रकार-उपप्रकार
(१) जैन दर्शनाचा संस्कृत सूत्रबद्ध शैलीतील प्रमाणित सर्वमान्य अशा तत्त्वार्थसूत्र या ग्रंथात, तत्त्वज्ञानाच्या अंगाने अहिंसेची व्याख्या दिली आहे - 'प्रमत्तयोगात प्राणव्यपरोपणं हिंसा'. याचा अर्थ असा की, 'रागद्वेष इत्यादींच्या योगाने प्राणांचे केलेले व्यपरोपण म्हणजे इजा, घात, दुखापत किंवा वध' - अशी व्याख्या केली आहे.
जैनांची अहिंसा समजावून घेताना, त्यांच्या पारिभाषिक भाषेत समजावून घेऊ या.
'प्राण' हे दहा आहेत- मन-वचन-काया ( ३ ) + ५ इंद्रिये + आयुष्य ( १ ) + श्वासोश्वास (१). यापैकी एक किंवा अधिक प्राणांचा घात, इजा, दुखापत, वध. मन-वचन-काया हे तीन योग आहेत. योग म्हणजे हालचाल अर्थात् मन-वचन-कायेच्या सर्व हालचाली.
जैनांच्या अहिंसाविषयक साहित्याचा आढावा घेतला तर इ. स. पूर्व ५०० पासून इ.स. १५०० पर्यंतच्या अर्धमागधी, जैन शौरसेनी, जैन महाराष्ट्री, संस्कृत आणि अपभ्रंश या पाचही प्रचलित भाषांमधील प्रत्येक ग्रंथात अहिंसाविवेचन आणि अहिंसामाहात्म्य आहे. आगमग्रंथांपैकी 'प्रश्नव्याकरण' उघडले की हिंसासूचक तीस पदावली त्यात दिसतात. ‘भगवती आराधना' या ग्रंथात अहिंसा विषयाला वाहिलेल्या शंभर गाथा आहेत. 'पुरुषार्थसिद्ध्युपाय' हा ग्रंथ तर अहिंसेच्या सूक्ष्मतम विवेचनाचा जणू कळसच आहे.
(२) जीव म्हणजे an individual soul. जीवाचे मुख्य लक्षण चेतना अर्थात् consciousness. त्याला पारिभाषिक शब्दात ‘उपयोग’ म्हणतात. उपयोग म्हणजे 'जाणीव' (दर्शन) आणि 'बोध' (ज्ञान). अति अति सूक्ष्म microbes म्हणजे निगोदी जीवांचे विस्ताराने वर्णन केलेले आढळते. जीवाची व्याप्ती म्हणाल तर 'जीव अनंत आहेत'. संख्यात, असंख्यात, अनंत, अनंतानंत अशी (infinite multiplied by infinite). अनंतानंत सूक्ष्म जीव हे आपल्या लोकाकाशात ठसाठस भरलेले आहेत.
तत्त्वार्थसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात मोक्षाच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, मर्जीनुसार हालचाल करण्याच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, एकेंद्रिय ते पंचेंद्रिय या दृष्टीने, जन्माच्या दृष्टीने, गर्भाच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने, लिंगाच्या दृष्टीने, गतींच्या दृष्टीने केलेले जीवांचे अतिसूक्ष्म वर्णन वाचले की जणू आपणBiology वाचतो आहोत असे वाटते.
पृथ्वी, अप्, तेज, वायु आणि वनस्पती हे सर्व सजीव आहेत. ते एकेंद्रिय जीव आहेत. अप्कायिक जीव म्हणजे पाण्यात असंख्य सूक्ष्म जीवजंतू दिसतात, असे नसून, 'पाणी हीच ज्यांची काया म्हणजे शरीर आहे', त्यांना 'जलकायिक जीव' म्हटले आहे. जसे आपले शरीर बनलेले आहे तसे पाण्याचे हे शरीर आहे. दैनंदिन जीवनात अहिंसा इतकी खोलवर पोहचण्याचे कारण की हे सर्व जीव आहेत - मी श्वास घेतला, मी पाणी प्यायले, मी भाजीफळे खाल्ली, मी चालले की या सर्व जीवांना इजा पोहोचतेच. म्हणूनच मर्यादेत यांचा वापर करावा.
(३) योग म्हणजे हालचाल. मनाच्या वाचेच्या आणि शरीराच्या कोणत्याही स्थूल अगर सूक्ष्म हालचालींना जैन परिभाषेत 'योग' म्हणतात. प्रत्येक हालचालीत हिंसा होते. विवेकी मनुष्याने प्रत्येक हालचाल सावधपणे म्हणजे 'अप्रमत्त' राहून करावी अशी अपेक्षा आहे.
(४) कृत-कारित आणि अनुमोदित असे तीन 'करण' सांगितले आहेत. स्वत: करणे- - दुसऱ्याकडून करविणे आणि करणाऱ्यास अनुमोदन देणे, असा या तीन करणांचा अर्थ आहे.
तीन करण x तीन योग = नऊ प्रकारे नवकोटिपरिशुद्ध हिंसेचा आजीवन त्याग हे 'महाव्रत' आहे.
(५) द्रव्यहिंसा आणि भावहिंसा अशा दोन प्रकारांनी सुद्धा हिंसेचे वर्णन करतात. द्रव्य म्हणजे दृश्य स्वरूप आणि भाव म्हणजे मनातील भावभावना. दुसऱ्याविषयी रागद्वेष इ. विकार मनात उद्भवले, कुठल्याही घातपाताच हिंसेची योजना मनात बनविली, हिंसेच्या विचारांचे मनात नियोजन करून झाले की ती झाली 'भावहिंसा'. हे सर्व प्रत्यक्ष करणे, ते वास्तव रूपात आणणे म्हणजे 'द्रव्यहिंसा'. जसा भाव कमी-अधिक तीव्र होतो तसा तीव्र - मंद पापबंध होतो. उदाहरणार्थ, एकजण दुसऱ्याला भर रस्त्यात त्वेषाने मारपीट करीत आहे. काहीजण आनंदाने तमाशा