________________
सूत्रकृतांगावरील लेख गुन्हेगारी जगत् आणि क्रियास्थान
व्याख्यान : डॉ. सौ. नलिनी जोशी
शब्दांकन : डॉ. सौ. अनीता बोथरा
दूरदर्शनवर 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया', 'लक्ष्य' इ. कार्यक्रम बघताना मन अगदी खिन्न होतं, बेचैन होतं, दु:खी होतं आणि खोल मनात एक विचार तरंगतो की, 'खरंचच ! हा अवसर्पिणी कालचक्राचा ‘दुखमा आरा' आहे'. किडनॅपिंग, रेप, खून, चाइल्ड अॅब्जूजमेंट, बाबा भोंदूगिरी, ह्युमन ट्रफिक, सायबर कॅफे-क्राइम,खंडणी इ. अनेक गुन्ह्यांच्या दर्शनानं मन हादरून जाते. विचार येतो - अरेरे ! अनेक प्रकारच्या दुःखांनी हे जग गच्च भरलं आहे. लहान बालकापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकाराने शोषित होत आहे, पीडित होत आहे आणि चिंतन सुरू होते की - आपण भ. महावीरांच्या समयीच जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते ! अशा प्रकारचे क्राइम ना पहावयास मिळाले असते, ना लोक त्या क्राइमचे बळी झाले असते. 'सत्यं, शिवं, सुंदरं' अशा जगाचा आपणही आस्वाद घेतला असता.
पण वास्तविकता अशी नाही -
सूत्रकृतांगातील (सूत्रकृतांग श्रुतस्कंध २, अध्ययन २) १३ क्रियास्थानांचे वर्णन वाचताना, 'वर्तमानात चालू असलेली गुन्हेगारीची झळ कमी आहे की काय ?' असे वाटू लागते. उत्तराध्ययनसूत्र (३१.१२), आवश्यकसूत्र (तेहतीस बोल), तत्त्वार्थसूत्र (६.६) इ. ग्रंथातही अशा प्रकारच्या क्रियास्थानांचे वर्णन आहे. त्या सर्वांचे मूळ सूत्रकृतांग आगमात सापडते.
याचाच अर्थ असा की भ. महावीरांच्या वेळी सुद्धा सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन, चांगल्या-वाईट प्रवृत्ती होत्या. त्यांनी यथाशक्य लोकांना सदुपदेश देण्याचा प्रयत्न केला. हिंसेच्या जगात भ. महावीरांनी प्रकाशाचा झोत टाकून, समाजापासून ते वैयक्तिक मनातल्या द्वंद्वापर्यंत दर्शन करविले. आपण आपल्या कल्पनाशक्तीनेही जितक्या हिंसक विषयांना स्पर्श करू शकलो नसतो त्याहून अधिक-सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे, त्या काळी भ. महावीरांनी आपल्या उपदेशाच्या माध्यमातून, क्रियास्थानांच्या रूपाने, प्रत्यक्ष स्वरूपच आपल्यासमोर वर्णिले.
हिंसेमागील प्रेरणा, त्यासाठी केली गेलेली प्रवृत्ती व त्याचे होत असलेले परिणाम अशा तीन मुद्यांना स्पर्श करणारा उपदेश त्यांनी दिला. अभ्यासातून असे लक्षात आले की त्यावेळचे गुन्हे आणि आत्ता होत असलेले गुन्हे, यात काही मोठा फरक नाही. वैयक्तिक दृष्ट्या माणूस निराशेत जाऊन कशी आत्महत्या करतो इथपासून ते थेट समाजात राहन नाती-परिवारासाठी इतरांचीही कशी पिळवणुक करतो येथपर्यंत-अशा सर्व प्रकारच्या विचारांनी भरलेली ही क्रियास्थाने आहेत र सुद्धा जितकी विषयांची विविधता नसेल तितकी विविधता भ. महावीरांन क्रियास्थानांच्या द्वारे निदर्शनास आणून दिली आहे. स्वत:च अधिक सुखात असावे, मी सर्वांवर सत्ता चालवावी. माझ्या कामवासनेची पूर्ती व्हावी, खूप पैसे मिळवावेत ही त्या सर्व क्रियास्थानांमागची प्रेरणा आहे व त्यासाठी अवलंबिलेले खालील वेगवेगळे हिंसक मार्ग आहेत.
* पारिवारिक कुशलतेसाठी, नाती-गोती-परिवार-मित्रमंडळी यांच्या भल्यासाठी, भरभराटीसाठी, देवीदेवतांसठि - अनेक प्रकारच्या जीवांची हिंसा म्हणजे 'अर्थदंड व परिणामस्वरूप पापकर्मांचा बंध.
* स्वत:साठी व दुसऱ्यासाठी, कोणतेही प्रयोजन नसताना विनाकारण - म्हणजे ना ही शरीरासाठी, ना ही उपजीविका म्हणून, ना ही पुत्र-पत्नी-पशु इ. च्या पोषणासाठी, ना घराच्या संरक्षणासाठी, ना प्राण्याच्या रक्षणासाठी
पण तरीही वनस्पतींचे छेदन-भेदन करणे, आग लावणे, प्राण्यांची चामडी काढणे, डोळे उखडणे, उपद्रव करणे इ. द्वारा जीवांना विना प्रयोजन शिक्षा देणे म्हणजे 'अनर्थदंड' व परिणामस्वरूप वैराचा बंध.