________________
दशलक्षणपर्व - चिंतन ८
डॉ. नलिनी जोशी
आजच्या अनुप्रेक्षात्मक चिंतनाचा पहिला विषय आहे - 'संवर'. संवर म्हणजे रोखणे, अडविणे, बांध घालणे.
__रूपकात्मक पद्धतीनं सांगितलं आहे की आत्म्यासह असलेलं शरीर ही भवसागरात लोटलेली नौका आहे. त्या नौकेला बेसावधपणा, दुर्लक्ष, आळस, मोह, अशुभ विचार, पापकर्म - अशी अनेक छिद्रं आहेत. त्या छिद्रातून कर्मप्रवाह सतत नौकेत स्रवत आहेत. आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं की नौकेत इतकं पाणी भरेल की ती गटांगळ्या खाऊ लागेल. फारच पाणी साचलं तर बुडूनही जाईल. त्या छिद्रांना बांध घालणं, अडवणं, पाणी आत येऊ न देणं म्हणजे संवर होय. ___सामान्य माणसांसाठी पूजार्ह व्यक्तींची पूजा, दान, परोपकार ही संवराची साधनं सांगितली आहेत. त्याहून जे अधिक विरक्त, त्यागी आहेत त्यांना अहिंसा-सत्य-अस्तेय-अपरिग्रह-ब्रह्मचर्य या पाच महाव्रतांचं पूर्णांशानं पालन करायला सांगितलं आहे.
संवराच्या या चिंतनानंतर साहजिकच हा प्रश्न उद्भवतो की नव्यानं आत येणाऱ्या कर्मांना जरी रोक लावला तरी नौकेत आधीच साचलेल्या पाण्याचं काय करायचं ? याच्या चिंतनाच्या मुद्याचं नाव आहे - 'निर्जरा'. कर्मसिद्धांताचा असा नियम आहे की ज्या कर्माची जेवढी कालमर्यादा बांधली आहे तेवढ्या कालमर्यादेमध्ये ते आपणास स्वभावानुसार फळ देते. फळ दिले की ते कर्म आत्म्याबरोबर रहात नाही. ते तेथून आपला संबंध काढून
घेते.
जसा आंबा झाडावर पिकून तयार झाला की देठ सैल होते. आंब्याचा आणि झाडाचा संबंध संपतो. तसेच स्वरूप कर्मांच्या निजरेचे आहे.
__ निर्जरा म्हणजे झडून जाणे. संबंध संपुष्टात येणे. ही निर्जरा दोन प्रकारची आहे. एक आहे आपोआप होणारी व दुसरी आहे विविध उपायांनी विचारपूर्वक घडवून आणलेली.
केलेलं प्रत्येक कर्म विशिष्ट काळापर्यंत आत्म्याबरोबर रहातं. त्याचा उदयकाळ येतो. त्याचं सुख-दुःखात्मक फळ मिळतं. नंतर ते कर्म आत्म्यापासून झडून जातं.
हे तर निसर्गनियमानुसार घडतं. मग मानवी इच्छाशक्तीला इथं वाव आहे का ? नक्कीच आहे. मानव हा विचारी, विवेकी, संयमी बनू शकतो. या सर्वांसाठी दृढ निर्धार लागतो. तपस्या करावी लागते. या तपस्येचं सामर्थ्य असं काही विलक्षण आहे की त्यायोगे उदयकाळापूर्वीच कर्म फळतं आणि निर्जरा होते. याला आंब्याचा दृष्टांत देतात. आंबा जसा झाडावर पिकतो, तसा आधीच तोडून, अढी लावून वेगानं आणि वेळेआधीही पिकवता येतो. यालाच 'निर्जरा' म्हणतात.
मानवी जन्म अत्यंत दर्लभ मानला आहे कारण इतर कोणत्याही योनीत तपस्येनं कर्मनिर्जरा करण्याचं सामर्थ्य नाही.
**********