________________
दशलक्षणपर्व - चिंतन ७
डॉ. नलिनी जोशी
चिंतनाच्या सातव्या टप्प्यावर मानवी शरीराच्या आत डोकावून पाहिले आहे. आपण जाणीवपूर्वक शरीराची निगा नीट ठेवतो म्हणून ठीक आहे, नाहीतर त्याचं स्वरूप किती 'अशुचि' अर्थात् 'घृणास्पद' आहे - याचा विचार अशुचि-अनुप्रेक्षेत केला आहे.
अत्यंत प्रभावीपणे शरीराच्या वस्तुस्थितीचं वर्णन केलेलं दिसतं. हा देह आतून हाडांनी रचलेला आहे. त्यावर मांसाचा लेप लावलेला आहे. त्यावर त्वचेचं वेष्टन चढवलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, हाडं आणि मज्जा हे त्याचे घटक आहेत. त्यात नऊ छिद्रे आहेत. त्यातून सतत अपवित्र स्राव झरत असतात.
__जर दैवयोगाने शरीराचा अंतर्भाग बाहेर आला तर अशा शरीराचा अनुभव घेणे तर दूरच, पण त्याकडं पहाणंही शक्य नाही. हे शरीर सुगंधित व्हावे म्हणून कापूर, कस्तूरी, चंदनाची उटी लावली तरी हे पुन्हा पुन्हा अपवित्र होते. उटी सुद्धा याच्या संपर्काने अपवित्र बनते. केवळ बाह्य मोहक सौंदर्यावर भाळू नकोस. आत डोकावलेस तर तुझी आसक्ती क्षणात सरून जाईल.
तुझी बुद्धी ताळ्यावर आहे ना ? मरणकाल दर आहे ना ? मग वेळीच सावध हो. तुझं काम खूपच कठीण आहे. कारण स्वभावतः अपवित्र असणाऱ्या शरीराला चुचकारून तुला त्याच्याकडून आत्म्याच्या कल्याणाचं काम करून घ्यायचं आहे !
चिंतनाच्या आठव्या मुद्याचं नाव आहे 'आस्रव अनुप्रेक्षा'. 'आस्रव' म्हणजे आत स्रवणे, प्रवेश करणे. हा आस्रव कशाचा ? कर्मांच्या प्रवाहांचा. ही कर्म आत्म्यात कशी प्रविष्ट होतात ? आस्रवांच्या द्वारांनी. ही द्वारं केणती ? पहिलं म्हणजे आत्म्याच्या अनंत सामर्थ्यावर श्रद्धा नसणं. दसरं द्वार आहे संयमाचा अभाव. तिसरं द्वार आहे - क्रोध, मान, माया, लोभ, मोह इत्यादींचा आपल्यावर असलेला पगडा. चौथं द्वार आहे - काया-वाचा-मनाने केलेल्या सर्व प्रवृत्ती.
या आस्रवद्वारांच्या मार्फत शुभ-अशुभ कर्म आत्म्यात प्रवेश करतात. आपल्या कृष्ण-नील-कापोत अथवा पीत-पद्म-शुभ्र वर्णांनी आपल्या मनोवृत्ती रंगवून टाकतात. प्रथम अशुभ कर्मांचा त्याग करून शुभ आस्रवांचा आधार घ्यावा. अंतिमत: शुभाचाही त्याग करून शुद्धतेकडे वाटचाल करावी.
ह्या आसवांचं वर्णन अशासाठी करावं लागतं की त्यायोगे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याची आपल्याला जाणीव होते. पक्षपात न करणं, स्वार्थ मनात धरून काम न करणं, इष्ट वस्तूत अतिशय आसक्ती आणि अनिष्ट वस्तूचा पराकोटीचा द्वेष - दोन्ही हेतुपूर्वक कमी करणं - हे सर्व या चिंतनाचं फलित आहे.
सोमदेव आचार्य अगदी साधा व्यावहारिक सल्लाही देतात की वाईट विचार मनात आणल्यानं फायदा तर होत नाहीच मात्र आपला जीव पाप मात्र पदरात बांधून घेतो.