________________
दशलक्षणपर्व - चिंतन १
डॉ. नलिनी जोशी
जैन परंपरेनं नित्यचिंतनासाठी एकूण १२ मुद्दे दिलेले आहेत. त्यांचा आपण दहा लघु-निवेदनात विचार करणार आहोत. कुन्दकुन्द आणि सोमदेव या प्रख्यात विचारवंतांनी प्राकृत आणि संस्कृतात प्रस्तुत केलेलं चिंतन सोप्या मराठीत मांडण्याचा हा अल्पसा प्रयास ! ।
पहिल्या अनुप्रेक्षेचं अर्थात् भावनेचं नाव आहे 'अनित्यता', 'अध्रुवता' अर्थात् 'क्षणभंगुरता'.
संपूर्ण इंद्रियांनी युक्त असं शरीर, आरोग्य, तारुण्य, शारीरिक सामर्थ्य, शरीराची टवटवी, कांती, सौंदर्य हेजरी प्राप्त झालं तरी चिरकाल टिकून रहात नाही. पावसाळ्यात आकाशात काळ्याभोर मेघांची दाटी होते. मावळतीच्या सूर्याची किरणं त्यांना भेदून जातात. सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रकट होतं. मन आनंदानं विभोर होतं. पण ते डोळ्यात साठवेपर्यंत किंवा कॅमेऱ्यात टिपेपर्यंत नाहीसं झालेलं, विखुरलेलं असतं. पाण्यावरचे बुडबुडे, दवबिंदू, वीज मेघ हे सुंदर दिसतात खरे पण काही क्षणांपुरतेच.
प्रत्येक प्राण्याचे श्वासोच्छ्वास रहाटगाडग्याच्या माळेप्रमाणं आहेत. रहाटगाडग्याची माळ जशी विहिरीतले पाणी बाहेर सोडून देते त्याप्रमाणे हे उच्छ्वास आपल्यामधे असलेलं आयुष्यरूपी पाणी बाहेर काढून टाकतात. रहाटगाडग्याची माळ पाणी सोडल्यावर रिकामी होऊन पुन्हा विहिरीमध्ये प्रवेश करते. त्याप्रमाणे ही श्वास घेण्याची क्रिया असते. बाहेर टाकणं आणि आत शिरणं हे काम अखंड चालू असतं. आपलं आयुष्यजल संपेपर्यंत हे श्वासोच्छ्वासाचं रहाटगाडगं चालू रहातं.
यम अथवा मृत्यू हा जंगलात पेटलेल्या प्रचंड वणव्यासारखा आहे. तो कधीही हे बघत नाही की मी तुच्छ गवत जाळत आहे की गगनचुंबी वृक्ष कवेत घेत आहे. तो सर्वांनाच जाळून भस्मसात् करतो. मृत्यूच्या लेखी सर्व जीव समानच आहेत. त्याला उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, तरुण-वृद्ध यातले कुठलेच भेद माहीत नाहीत.
वाऱ्याची चक्राकार वावटळ धुळीच्या समूहाला पहिल्या क्षणी फार उंच नेते. परंतु लागलीच दुसऱ्या क्षणी त्यास खाली टाकून देते. सत्ता आणि संपत्तीची चक्रीवादळेही मनुष्याला क्षणात उच्च पदावर पोहोचवतात तर कालांतराने जमीनदोस्त करतात.
लक्ष्मीचा तोरा काही औरच ! नम्र, शूर, परोपकारी, कुलीन आणि धार्मिक माणसं हिच्या फार काळ पसंतीस रहात नाहीत. बहुधा ही दुर्जनांची मैत्रीण असते. हिच्या संगतीनं सर्वांच्याच मनात लोभ बळावतो. लोभ हा सर्व पापांचा बापच असतो.
दूध आणि पाणी यांचा जसा दृढ संबंध असतो तसाच देह आणि आत्मा यांचा असतो. हा नश्वर देह आत्म्याशी संबंध तोडून टाकतो आणि विनाश पावतो. आत्म्याशी एकरूप असलेला देहदेखील नाशवंत आहे तर मग भोगउपभोग यांना कारण असलेले पदार्थ नित्य कसे बरे असू शकतील ?
वाचकहो, अनित्यता, ध्रुवता नसणं, अस्थिरता, क्षणभंगुरता - अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा चिंतनाचा पहिला मुद्दा नैराश्याकडे नेण्यासाठी सांगितलेला नाही. लाभलेला प्रत्येक क्षण सार्थकी लावण्याची प्रेरणा त्यात दडली आहे.
**********